हायलाइट्स:
- नारायण राणे यांच्या गटाला बालेकिल्ल्यात आव्हान
- जिल्हा बँक संचालक प्रज्ञा परब यांचा राष्ट्रवादी काँग्रेस पक्षात प्रवेश
- जिल्हा बँक निवडणूक चुरशीची ठरण्याची शक्यता
प्रज्ञा परब या गेली दोन वर्ष काँग्रेस पक्षात सक्रिय नव्हत्या. मात्र कट्टर नारायण राणे समर्थक म्हणून त्यांची ओळख होती. परब यांनी आज राष्ट्रवादीत प्रवेश केला असून त्यांच्या सोबत वेंगुर्ला तालुक्यातील कार्यकर्त्यांनी राष्ट्रवादीत प्रवेश केला आहे. त्यामुळे आगामी जिल्हा बँक निवडणूक चुरशीची ठरण्याची शक्यता आहे.
जयंत पाटलांचा भाजपवर निशाणा
राष्ट्रवादी परिवार संवाद यात्रेच्या निमित्ताने कोकणात असलेल्या जयंत पाटील यांनी पत्रकार परिषदेत भाजपवर जोरदार टीका केली. ‘सरकारला अडचणीत आणण्याचा प्रयत्न भाजपकडून होत आहे. केंद्रीय तपास यंत्रणांच्या माध्यमातून हे केलं जात आहे. मात्र अडचणीत आणणारी व्यक्तीचं अडचणीत येत आहे,’ असा टोला जयंत पाटील यांनी लगावला.
समीर वानखेडे प्रकरणावरही भाष्य
एनसीबीचे संचालक समीर वानखेडे हे सध्या त्यांच्यावर होत असलेल्या विविध आरोपांमुळे चर्चेत आहेत. जयंत पाटील यांनी या प्रकरणाविषयीही प्रतिक्रिया दिली आहे. ‘एखाद्या अधिकाऱ्याने मागासवर्गीय समाजाच्या एखाद्या तरुणाची संधी हिरावून घेऊन खोटं प्रमाणपत्र दाखवून नोकरीत प्रवेश केला असल्यास ही फार गंभीर बाब आहे. महाराष्ट्रात मागासवर्गीय आरक्षणातून तरुणांना जागा मिळू शकतात, त्यातील एका माणसावर अन्याय झाला असेल. त्यामुळे ते खोटं प्रमाणपत्र असेल तर ते फार गंभीर आहे,’ असं जयंत पाटील यांनी म्हटलं आहे.
Marathi News: मराठी बातम्या, Latest News in Marathi, Breaking Marathi News, Marathi News Paper | Maharashtra Times