हायलाइट्स:

  • २४ वर्षीय युवकाने कर्ज फेडण्यासाठी केलं धक्कादायक कृत्य
  • चाकूच्या धाकावर ५० हजार रुपये लुटण्याचा प्रयत्न
  • पोलिसांनी आरोपीला ताब्यात घेतले

अमरावती : भारतीय स्टेट बँकेच्या ग्राहक सेवा केंद्रात एका २४ वर्षीय युवकाने चाकूच्या धाकावर ५० हजार रुपये लुटण्याचा प्रयत्न केला. मात्र त्याला बँकेतील नागरिक व सुरक्षारक्षकांनी पकडले. यावेळी त्याला कोतवाली पोलिसांच्या स्वाधीन करण्यात आले. ऑनलाइन काढलेले ७० हजार रुपयांचे कर्ज फेडण्यासाठी फार्मसीचे शिक्षण घेणाऱ्या विद्यार्थ्याने हा प्रयत्न केल्याचं पोलिसांच्या प्राथमिक तपासात समोर आलं आहे.

शिवदास रामेश्वर पाडे (अकोट) असं पकडलेल्या विद्यार्थ्याचं नाव आहे. श्याम चौकातील एसबीआय परिसरातच बँक ग्राहकांच्या सुविधेसाठी ग्राहक सुविधा केंद्र सुरू आहे. दरम्यान, शिवदास या ग्राहक सेवा केंद्राजवळ गेला. त्या ठिकाणी एक युवती ग्राहकांना रक्कम देणे, अर्ज स्वीकारणे आदी कामांसाठी कर्तव्यावर होती. याचवेळी शिवदासने त्या युवतीला चाकूचा धाक दाखवून तिच्यासमोर असलेल्या ड्रावरमधून ५० हजार रुपये काढले आणि पळून जाण्याच्या प्रयत्न केला. त्याचवेळी युवतीने त्याच्या हाताला झटका दिल्यामुळे ती रक्कम त्याच ठिकाणी पडली.

गडचिरोली जिल्ह्यात भूकंपाचे सौम्य धक्के; जीवित अथवा वित्त हानी नाही!

यावेळी युवतीने आरडाओरड केल्यामुळे बँकेचे सुरक्षारक्षक व नागरिकांनी त्याला पकडले. ही माहिती कोतवाली पोलिसांना देण्यात आल्यानंतर पोलिसांनी आरोपीला ताब्यात घेतले.

दरम्यान, आरोपी तरुण हा शहरातील मार्डी मार्गावरील एका महाविद्यालयात फार्मसीच्या अंतिम वर्षात शिक्षण घेत आहे. मागील काळात ऑनलाइन पद्धतीने सुमारे ६० ते ७० हजार रुपये त्याने कर्ज घेतले आहे. या कर्जाची परतफेड करणे गरजेचे असल्यामुळे त्याला पैशांची आवश्यकता होती, त्यासाठीच शिवदीप पाडे याने हा प्रयत्न केल्याचं प्राथमिक तपासात समोर आलं, अशी माहिती कोतवालीचे एपीआय सोनोने यांनी दिली.

Maharashtra News, Latest Maharashtra News in Marathi, ‎महाराष्ट्र ठळक बातम्या | Maharashtra Times

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here