म. टा. विशेष प्रतिनिधी,

ऑक्टोबरच्या शेवटच्या आठवड्यात परीक्षा संपल्यानंतर बच्चेकंपनीच्या हातामध्ये फटाक्याच्या बंदुका दिसू लागल्या असून गेल्या वर्षी वाजवणे शक्य नसल्याने यंदा मात्र त्याची कसर भरून काढण्याची चर्चा रंगली आहे. त्याच वेळी वातावरणात हळुहळू गारवा जाणवत असल्याने हवेच्या गुणवत्तेचीही पातळी खालावली असून दिवाळीच्या दिवसांमध्ये यंदा किती मोठ्या प्रमाणात धूर, प्रदूषण होईल याची भीती श्वसन विकारग्रस्तांना तसेच ज्येष्ठ नागरिकांना सतावत आहे. गल्लोगल्ली सुरू झालेल्या फटाक्यांच्या स्टॉलवर खोक्यांवरील चित्रे आणि किंमत पाहून फटाके खरेदी होत असून त्यामध्ये कोणते घटक आहेत, त्यातील कोणते घटक अधिक घातक आहे याची फारशी चौकशी केली जात नसल्याचे दिसत आहे.

करोनामुळे गेल्या वर्षी फटाके वाजवण्यावर निर्बंध होते. गेल्या वर्षी फटाके विकणाऱ्यांना याचा काही प्रमाणात फटका बसला होता. यंदा दिवाळीच्या आठवडाभर आधी लहान-मोठ्या टोपल्यांपासून स्टॉलपर्यंत फटाके सजले असून ग्राहकांकडून फटाक्यांची मागणी होत असल्याचे सांगण्यात येत आहे. हे फटाके घेताना त्याबद्दल फारशी माहिती घेतली जात नाही. हरित फटाक्यांचीही फारशी मागणी होताना दिसत नाही, असे काही फटाके विक्रेते सांगत आहेत. ग्राहक केवळ किंमत, खोक्यावरील चित्र या माहितीच्या आधारेच फटाके खरेदी करत आहेत. फटाक्यांमधील घटक किंवा खोक्यावरील माहिती याबद्दल विक्रेतेही स्वतःहून माहिती देत नाहीत. एखाद-दुसरा ग्राहकच येऊन हरित फटाक्यांविषयी माहिती विचारत आहे, असे किरकोळ विक्रेते सांगतात.

मुंबईमध्ये सांताक्रूझ येथे किमान तापमानाचा पारा रविवारी सकाळी २४ अंश सेल्सिअस होता, तर कुलाबा येथे २४.४ अंश सेल्सिअस होता. मुंबईमध्ये हवेच्या गुणवत्तेचा दर्जा मध्यम आहे. समुद्रावरून येणाऱ्या वाऱ्यांचा वेग नसल्याने प्रदूषके हवेत साचून राहत आहेत. रविवारी कुलाबा, चेंबूर, अंधेरी, भांडुप, मालाड आणि बोरिवली येथे हवेची गुणवत्ता मध्यम स्वरूपाची होती. सध्या फारसे फटाके फुटत नसताना हवेची गुणवत्ता काही ठिकाणी खालावल्याचे दिसून येत आहे. तापमानात होत असलेल्या बदलांमुळे आणि वाढलेल्या प्रदूषणामुळे श्वसनाचे विकार असलेल्यांवर याचा परिणाम होण्याची भीती आहे. दिल्लीमध्ये सध्या हवेची गुणवत्ता अतीवाईट नोंदवली जात आहे. दिल्लीत येत्या दोन दिवसांमध्ये हवेची दिशा बदलून काही प्रमाणात गुणवत्ता सुधारण्याची शक्यता आहे. मात्र दिवाळीच्या काळात मुंबईची हवा दिल्लीतील हवेच्या गुणवत्तेशी स्पर्धा करते असेही या आधी दिसून आले आहे. त्यामुळे यासंदर्भात नागरिकांनीही प्रदूषणाच्या आकडेवारीवर लक्ष ठेवावे, अशी अपेक्षा व्यक्त करण्यात येत आहे.

पुढील तीन दिवस हवेचा दर्जा मध्यम

पुढील तीन दिवस तरी हवेचा दर्जा मध्यम असण्याचाच अंदाज सफर या हवेची गुणवत्ता नोंदणाऱ्या प्रणालीच्या माध्यमातून वर्तवण्यात आला आहे. रविवारी माझगाव येथील हवेची गुणवत्ता अतीवाईट होती, तर वांद्रे-कुर्ला संकुल येथे हवेची गुणवत्ता वाईट होती.

Marathi News: मराठी बातम्या, Latest News in Marathi, Breaking Marathi News, Marathi News Paper | Maharashtra Times

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here