मुंबई टाइम्स टीम

आईचं नियोजन पक्कंयंदा आम्ही दोघांनी ठरवलंय की, घरात असलेल्या ज्यादाच्या गोष्टी बाहेर काढायच्या. बऱ्याच गोष्टी उत्सुकतेपोटी घेतल्या गेल्या. पण आता हा सगळा पसारा आवरायचा आणि नको असलेलं सगळं बाहेर काढायचं. आम्ही साफसफाईला सुरुवात केली आणि आम्हाला वाटलं की, अर्ध्या तासात होईल, पण घडलं भलतंच. रात्रीचे ११.३० वाजले तरी घरातला अर्धा पसारासुद्धा आवरुन झालेल नव्हता. मी बाहेर जाऊन मोठ्या पिशव्या घेऊन आलो आणि नंतर दोन अडीच वाजेपर्यंत आवरत होतो. त्यावेळी कळलं की, आई वेळेचं नियोजन करून साफसफाई करत असते.

– सिद्धार्थ चांदेकर, अभिनेता

फराळाचं अप्रूपसध्या आम्ही स्वतःहून साफसफाई करत नाही. पण लहाणपणी साफसफाई म्हटल्यावर अंगात एक वेगळाच उत्साह संचारायचा. अनेकदा साफसफाई करताना मला माळ्यावर हरवलेल्या गोष्टी सापडायच्या. सर्वात मोठं आव्हान असायचं, ते म्हणजे पंखा स्वच्छ करणं. त्यावर वर्षभराची धूळ जमलेली असायची. ती काढण्यासाठी आपण वरती चढायचं, ती धूळ काढायची आणि ती काढताना आपणसुद्धा धुळीने माखून जायचो. अशात एक गोष्ट उत्तम असायची, ती म्हणजे हे सगळं झालं रे झालं की, फराळावर ताव मारायला मिळायचा. मायेने केलेल्या त्या फराळाची मज्जा काही औरच असायची.
– अमेय वाघ, अभिनेता

लक्षात राहिलेली मांजर
आमच्या आधीच्या घरी एक मांजर यायची. ऐन दिवाळीत ती मांजर आमच्या घरी यायची आणि सतत काहीना काही खायला मागायची. तिला सगळं द्यायचो. ती मांजर पसारा पाहून घाबरायची. आम्ही साफसफाई करत असताना त्या सामानाच्यावर ती मांजर उड्या मारायची आणि ते पाहून माझी आई फार वैतागायची. या दिवाळीत नव्या घरी साफसफाई करायला घेतली आणि त्या मांजरीची आठवण येऊ लागली. काही महिन्यांपूर्वीच त्या मांजरीचं निधन झालं. ती मांजर करत असलेल्या मस्तीची फार आठवण येतेय.
– अभिज्ञा भावे, अभिनेत्री

आठवणींचा स्क्रीन प्ले
‘हम आपके है कोन’ हा चित्रपट माझ्या लहानपणी आलेला आणि त्याची मी चाहती होते. त्या चित्रपटाच्या पोस्टर किंवा पेपरमध्ये येणाऱ्या जाहिराती कापून त्याची एक वही तयार केली होती. त्या वहीत अनेक गोष्टी लिहून ठेवल्या होत्या. यंदा साफसफाई करताना मला ती वही सापडली. ती उघडून पाहिल्यावर मला जाणीव झाली की, मी किती वेळ असाच फुकट घालवला आहे. पण ती वही पाहताना आठवणींचा स्क्रीन प्ले डोळ्यांसमोर आला. यंदा साफसफाईपासून रोषणाईपर्यंत सगळं काही माझा नवरा करत आहे. मी त्याला असं कर, तसं कर असे आदेश देत आहे.

– शर्मिष्ठा राऊत, अभिनेत्री

संकलन- सुरज कांबळे

Marathi News: मराठी बातम्या, Latest News in Marathi, Breaking Marathi News, Marathi News Paper | Maharashtra Times

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here