हायलाइट्स:
- पंतप्रधान नरेंद्र मोदींनी बोलावली बैठक
- ४८ जिल्ह्यांचे जिल्हाधिकारी होणार सहभागी
- पंतप्रधान मोदी लसीकरणाचा आढावा घेणार
देशात जिथे लसीकरण कमी प्रमाणात झाले आहे, अशा ४०हून अधिक जिल्ह्यांच्या जिल्हाधिकाऱ्यांसोबत पंतप्रधान नरेंद्र मोदी येत्या बुधवारी (तीन नोव्हेंबर) आढावा बैठक घेणार आहेत. पंतप्रधान कार्यालयाने रविवारी ही माहिती दिली.
लशीचा पहिला डोस जिथे ५० टक्क्यांहून कमी नागरिकांना देण्यात आला आहे व दुसरा डोस देण्याचा वेगही खूप कमी आहे, अशा जिल्ह्यांमधील लसीकरणाचा या बैठकीत आढावा घेण्यात येणार आहे. यामध्ये महाराष्ट्रासह झारखंड, मणिपूर, नागालँड, अरुणाचल प्रदेश, मेघालय व अन्य राज्यांतील जिल्ह्यांचा समावेश आहे. दूरदृष्य प्रणालीद्वारे होणाऱ्या या बैठकीला संबंधित राज्यांचे मुख्यमंत्रीही उपस्थित राहतील. पंतप्रधान मोदी जी-२० आणि सीओपी२४ परिषदांना हजेरी लावून मायदेश परतल्यानंतर लगेचच ही आढावा बैठक घेणार असल्याचे पंतप्रधान कार्यालयाकडून सांगण्यात आले. दरम्यान, केंद्रीय आरोग्यमंत्री मनसुख मंडाविया यांनी अलीकडेच देशात लसीकरणाचा वेग वाढवण्याची गरज व्यक्त करून १०.३४ टक्के नागरिकांनी पहिल्या डोसनंतरचा कालावधी संपूनही दुसरा डोस घेतला नसल्याचे नमूद केले होते.
रुग्णांचा २४७ दिवसांतील नीचांक
दरम्यान, देशात मागील २४ तासांत १२ हजार ८३० नवीन करोनारुग्णांची भर पडून एकूण रुग्णसंख्या तीन कोटी ४२ लाख ७३ हजार ३००वर पोहोचली. दुसरीकडे उपचाराधीन रुग्णांच्या संख्येत दोन हजार २८३ने घट होऊन ती एक लाख ५९ हजार २७२वर आली आहे. मागील २४७ दिवसांतील हा नीचांक आहे. दैनंदिन ४४५ मृत्यूंसह करोनामुळे दगावलेल्यांचा आकडा चार लाख ५८ हजार १८५ झाला असून, आत्तापर्यंत तीन कोटी ३६ लाख ५५ हजार ८४२ जणांनी या आजारावर मात केली आहे. देशातील करोनामृत्यूचे प्रमाण १.३४, तर रुग्ण बरे होण्याचे प्रमाण ९८.२० टक्के असल्याचे केंद्रीय आरोग्य मंत्रालयाने रविवारी नमूद केले.
‘झायडस’चा डोस २६५ रुपयांना
केंद्र सरकारसोबतच्या वाटाघाटीनंतर झायडस कॅडिलाने आपल्या करोनाप्रतिबंधक लशीची किंमत २६५वर आणण्याची तयारी दर्शवली होती. मात्र, याबाबतचा अंतिम निर्णय अद्याप बाकी असल्याचे सूत्रांनी रविवारी सांगितले. देशाच्या औषध नियामकांनी १२ वर्षे व त्यावरील वयोगटातील नागरिकांच्या लसीकरणासाठी ‘झायडस कॅडिला’च्या ‘झायकोव्ह-डी’ लशीला मंजुरी दिली आहे. सध्या सर्व खर्च मिळून या लशीची किंमत ३५८ रुपये प्रतिडोस खर्च आहे.
Marathi News: मराठी बातम्या, Latest News in Marathi, Breaking Marathi News, Marathi News Paper | Maharashtra Times