हायलाइट्स:
- नवाब मलिकांचे फडणवीस यांच्यावर गंभीर आरोप
- ड्रग्ज तस्कराचा फडणवीस यांच्यासोबत संबंध असल्याचा दावा
- नितेश राणेंनी दिलं राष्ट्रवादीला प्रत्युत्तर
“नवाब मलिक यांनी हिट विकेट घालवली आहे. आता देवेंद्र फडणवीस हे ‘मौके पे चौका’ मारणार,” असं ट्वीट करत नितेश राणे यांनी राष्ट्रवादीला इशारा दिला आहे.
भाजप आणि देवेंद्र फडणवीस यांच्यावर टीका झाल्यानंतर नितेश राणे आणि माजी खासदार निलेश राणे हे मैदानात उतरत असल्याचं याआधीही पाहायला मिळालं आहे. त्यामुळे नवाब मलिक यांनी केलेल्या आरोपांवरून आगामी काळातही राणेंकडून मलिक यांच्यावर निशाणा साधला जाण्याची शक्यता आहे.
काय आहेत नवाब मलिक यांचे आरोप?
नवाब मलिक यांनी आज एक फोटो ट्वीट करत देवेंद्र फडणवीस आणि त्यांच्या पत्नी अमृता फडणवीस यांच्यावर घणाघाती आरोप केले. मलिक यांनी ट्विटरवरुन अमृता फडणवीसांचा फोटो शेअर केला आहे. या फोटोत अमृता फडणवीस यांच्यासोबत फोटोत असणारी व्यक्ती ड्रग्ज पेडलर असल्याचा दावा केला जात आहे.
दरम्यान, मलिक यांनी केलेल्या आरोपानंतर देवेंद्र फडणवीस यांनीही हे आरोप फेटाळून लावत राष्ट्रवादीवर पलटवार केला. मलिक यांनी आता लवंगी फटाका लावला आहे, दिवाळीनंतर मी बॉम्ब फोडणार आहे, असं म्हणत फडणवीस यांनी राष्ट्रवादीला इशारा दिला आहे. त्यामुळे आगामी काळात या प्रकरणी नेमक्या काय घडामोडी घडतात, हे पाहणं महत्त्वाचं ठरणार आहे.
Maharashtra News, Latest Maharashtra News in Marathi, महाराष्ट्र ठळक बातम्या | Maharashtra Times