हायलाइट्स:

  • शेतकऱ्याने केला आत्महत्या प्रयत्न
  • सिडको कार्यालयात खळबळ
  • शेतकऱ्यावर एमजीएम रुग्णालयात उपचार सुरू

मनोज जालनावाला | नवी मुंबई :

उरणच्या धुतूम गावातील एका शेतकऱ्याने सिडको कार्यालयात जाऊन अधिकाऱ्यांसमोर कीटकनाशक द्रव्य (विष) प्राशन करून आत्महत्या करण्याचा प्रयत्न केल्याची खळबळजनक घटना सोमवारी दुपारी घडली. दत्तु भिवा ठाकूर (७८) असं या शेतकऱ्याचं नाव असून त्यांना उपचारासाठी एमजीएम रुग्णालयातील अतिदक्षता विभागात दाखल करण्यात आलं आहे.

या घटनेतील शेतकरी दत्तू भिवा ठाकूर हे उरणच्या धुतूम गावातील असून सिडकोने त्यांची जमीन १९८४ मध्ये संपादित केली आहे. त्यामुळे सिडकोकडून साडेबारा टक्के योजनेअंतर्गत भूखंड मिळवण्यासाठी दत्तू ठाकूर हे गेल्या अनेक वर्षापासून सिडकोमध्ये हेलपाटे घालत आहेत. सिडकोकडून साडेबारा टक्के योजनेतील भूखंड मिळत नसल्याने गत १८ ऑक्टोबर रोजी दत्तू ठाकूर हे सिडकोच्या कार्यालयात गेले होते, त्यावेळी त्यांनी आत्मदहन करण्याचा इशारा दिला होता. मात्र तुमची जमीन नियाज खात्यात येत असल्याने, व नियाज खात्यातील जमिनींना साडेबारा टक्के योजनेचा लाभ देण्यासंदर्भातील विषय शासनाकडे प्रलंबित असल्याचं सिडकोच्या अधिकाऱ्यांकडून सांगण्यात आलं होतं.

Aryan Khan Case: आर्यन खानच्या सुटकेसाठी २५ कोटींची खंडणी?; सॅम डिसूझाने केला मोठा गोप्यस्फोट

दत्तू ठाकूर हे आज पुन्हा सिडकोच्या कार्यालयात पहिल्या मजल्यावर गेले होते, यावेळी ते अप्पर जिल्हाधिकारी तथा मुख्य भूमी व भूमापन अधिकारी (भूसंपादन ) सतीश खडके यांच्या दालनात गेल्यानंतर त्यांनी सोबत आणलेले कीटकनाशक सदृश्य द्रव्य प्राशन केले. हा प्रकार तेथील अधिकाऱ्यांच्या लक्षात आल्यानंतर त्यांनी तत्काळ दत्तू ठाकूर यांना एमजीएम रुग्णालयात दाखल केले. अचानक घडलेल्या या प्रकारानंतर एकच खळबळ उडाली. सध्या ठाकूर यांच्यावर एमजीएम रुग्णालयाच्या अतिदक्षता विभागात उपचार सुरू असून त्यांची प्रकृती स्थिर आहे. या प्रकरणाची नोंद करण्यात आली असून पुढील चौकशी सुरू असल्याची माहिती सीबीडी पोलीस ठाण्याचे वरिष्ठ पोलीस निरीक्षक अनिल पाटील यांनी दिली.

sameer wankhede : समीर वानखेडेंची दिल्लीत NCB मुख्यालयात साडेचार तास झाली कसून चौकशी

निर्णय शासनस्तरावर प्रलंबित

सिडकोने संपादित केलेल्या नियाज खात्यातील जमिनींना २००६ पर्यंत साडेबारा टक्के योजनेचा लाभ दिलेला आहे. मात्र ट्रस्टच्या जमिनींना तसंच नियाज खात्यातील जमिनींना कुळ लागल्याने सिडकोने २००६ नंतर ट्रस्टच्या कुळांना, नियाज खात्यातील कुळांना तसंच पोटखराबा जमिनींना लाभ द्यायचा की नाही? यावर निर्णय घेण्यासाठी नगरविकास विभागाकडे प्रस्ताव पाठवला आहे. या प्रस्तावावर अद्याप शासनाने निर्णय घेतलेला नाही. त्यामुळे ट्रस्ट व नियाज खात्यातील जमींनीना साडेबारा टक्के योजनेचा लाभ देण्याचे सिडकोने सध्या स्थगित केलं आहे.

सिडकोने उचलला उपचाराचा खर्च

दत्तू ठाकूर यांच्याशी संबंधित विषय हा शासन दरबारी विचाराधीन असून त्याबाबतचा पाठपुरावा सिडकोतर्फे वेळोवेळी करण्यात येत आहे. सदरची वस्तुस्थिती दत्तू ठाकूर यांना पत्राद्वारे तसंच प्रत्यक्ष देण्यात आली होती. असं असतानाही त्यांनी हा प्रकार केला, असं सिडकोचं म्हणणं आहे. सिडकोने नेहमीच प्रकल्पबाधितांच्या हिताला प्राधान्य दिलं आहे. त्यांच्या सहकार्यामुळेच नवी मुंबई शहर उभारण्यात आलं आहे. सदर दुर्दैवी घटना ही सिडको भवनमध्ये घडली असल्याने दत्तू भिवा ठाकूर यांच्या वैद्यकीय उपचाराचा सर्व खर्च हा सिडको महामंडळातर्फे उचलण्यात येत असल्याचंही सिडकोकडून स्पष्ट करण्यात आलं आहे.

Maharashtra News, Latest Maharashtra News in Marathi, ‎महाराष्ट्र ठळक बातम्या | Maharashtra Times

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here