‘येस’ बँकेतील निर्बंधांच्या पार्श्वभूमीवर सावंत यांनी आपल्या अधिकृत ट्विटर हँडलवरून देशातील बँकांच्या स्थितीवर भाष्य करताना केंद्र सरकारवर सडकून टीका केली आहे. ‘येस बँकेवर रिझर्व्ह बँकेने निर्बंध घातल्याने या बँकेत ठेवलेले पैसे काढण्यासाठी लोकांच्या रांगा लागलेल्या आहेत. याआधी पंजाब महाराष्ट्र बँकेतील घोटाळ्यामुळे आयुष्यभराची कमाई बुडाली. अनेकांचे मृत्यू झाले. नोटबंदीमध्ये कोट्यवधी लोक रस्त्यावर आले. जवळपास १५० लोकांचा जीव गेला. त्यातही बहुसंख्य हिंदूच होते. देशात आत्महत्या करणाऱ्या तरुण व शेतकऱ्यांमध्येही बहुसंख्य हिंदूच आहेत. आता तीच वेळ येस बँकेत पैसा असलेल्या लोकांवर आलेली आहे. या बँकांमध्ये पैसे गुंतवणारे बहुसंख्य हिंदूच आहेत. या बँकेतील संकटाने हिंदूंच्या देवालाही सोडले नाही. पुरीच्या भगवान जगन्नाथ मंदिराचे विविध राष्ट्रीयकृत बँकांमध्ये असलेले ५४५ कोटी रुपये एक महिन्याआधी याच ‘येस’ बँकेत जमा करण्यात आले होते, ते पैसेही आता बुडीतच जमा झाले आहेत, असं सावंत यांनी म्हटलं आहे.
भारतीय जनता पक्ष व त्यांच्याशी संलग्न संघटनांकडून देशात धृवीकरणाच्या हिन राजकारणाकरीता ‘हिंदू खतरें में,’ असे उर बडवून सांगितले जात असताना मोदींच्या राज्यात खरेच ‘हिंदू खतरें में’, अशी स्थिती झाली आहे, असे म्हणावे लागते. देशातील बँकांमध्ये असणारा पैसा हा बहुसंख्य हिंदूंचाच असून तो सुरक्षित राहिलेला तर नाहीच पण अनेक कुटुंबंही उद्धस्त झाली आहेत त्याला मोदी सरकारच जबाबदार आहे, असा हल्लाबोल महाराष्ट्र प्रदेश काँग्रेस कमिटीचे सरचिटणीस व प्रवक्ते सचिन सावंत यांनी केला आहे.
नीरव मोदी, मेहुल चोक्सी, विजय मल्ल्या बँकांचे कोट्यवधी रुपये लुटून पळून गेले, तो पैसाही या देशातील बहुसंख्य हिंदूंचाच होता. या येस बँकेत १८,२३८ कर्मचारी असून यातील जवळपास सर्वच हिंदू आहेत. त्यांच्या नोकऱ्याही धोक्यात आल्या आहेत. याला सर्वस्वी मोदी सरकारच जबाबदार असून त्यांच्याच निष्र्किय कारभाराचा फकटा या हिंदूंना बसला आहे. मोदींच्या अशा कारभाराचा फटका हा या देशातील बहुसंख्य हिंदूंनाच बसत असताना काहीही कारवाई केली जात नाही. हे भीषण वास्तव पाहता हिंदूंना इतर कोणापासून नाही तर मोदी सरकारपासूनच जास्त धोका आहे, असा आरोपही सावंत यांनी केला.
Maharashtra News, Latest Maharashtra News in Marathi, महाराष्ट्र ठळक बातम्या | Maharashtra Times