Aryan Khan Drugs Case Sameer Wankhede Visits Sc Panel With His Caste Documents – Sameer Wankhede: समीर वानखेडेंकडून आयोगासमोर जातीची कागदपत्रे सादर | Maharashtra Times
नवी दिल्ली : वादाच्या भोवऱ्यात सापडलेले मुंबई एनसीबीचे प्रादेशिक संचालक समीर वानखडे यांनी सोमवारी दिल्लीत येऊन त्यांच्या जात प्रमाणपत्राशी संबंधित सारी कागदपत्रे राष्ट्रीय अनुसूचित जाती आयोगाचे अध्यक्ष विजय सांपला यांना सादर केली. वानखेडे यांनी सादर केलेला दस्तावेज महाराष्ट्र सरकारकडे पडताळणीसाठी पाठविण्याचे आदेश देण्यात आले असून, ती खरी निघाल्यास वानखेडे यांच्यावर कोणतीही कारवाई होणार नाही, असे सांपला यांनी स्पष्ट केले.
समीर वानखेडे यांनी आयोगापुढे आपले जात प्रमाणपत्र, पहिल्या पत्नीपासून जन्मलेल्या मुलाचे जन्म प्रमाणपत्र आणि घटस्फोटाशी संबंधित कागदपत्रे सोपविली. आपल्याला त्रस्त केले जात असून एखाद्या खोट्या प्रकरणात अडकविण्याचा प्रयत्न केला जात असल्याचा आरोप वानखेडे यांनी आयोगापुढे केला. या संबंधात आयोगाने २९ ऑक्टोबर रोजी महाराष्ट्राचे मुख्य सचिव, पोलिस महासंचालक आणि पोलिस आयुक्तांना नोटीस पाठवून सात दिवसांच्या आत सर्व माहिती मागितली आहे. वानखेडे यांच्या जातीशी संबंधित माहिती अपूर्ण आहे किंवा ती उपलब्ध केली गेली नाही तर समिती स्थापन करून चौकशी करण्याचे अधिकार आयोगाला आहेत. वानखेडे यांनी सादर केलेली कागदपत्रे खरी निघाल्यास त्यांच्या अधिकारांचे रक्षण सुनिश्चित केले जाईल, असे सांपला यांनी सांगितले.