हायलाइट्स:
- सिव्हिल इंजिनीअर तरूण बनला अट्टल सोनसाखळी चोर
- नाशिकमध्ये ५६ सोनसाखळी चोरीच्या घटनांमध्ये होता सामील
- साथीदारासह इतर चार ज्वेलर्सनाही केली अटक
- सोनसाखळ्या विकून मिळालेले पैसे गर्लफ्रेंडसाठी करायचा खर्च
पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, उमेश पाटील असे या सिव्हिल इंजिनीअरचे नाव असून, तो नोकरीला होता. मात्र, त्याला समाधानकारक पगार नव्हता. त्याने चोरी करण्यास सुरुवात केली. चोरी केलेल्या सोनसाखळी विकून मिळालेले पैसे तो आपल्या गर्लफ्रेंडवर उधळायचा.
उमेश पाटीलचा आणखी एक साथीदार तुषार ढिकले (वय ३०) हा अनेक गुन्ह्यांमध्ये सामील होता. सोनसाखळी चोरीच्या ५६ घटनांपैकी २० घटनांमध्ये तो सामील होता. मात्र, गेल्या वर्षी नोव्हेंबरमध्ये त्या दोघांमध्ये बिनसले. त्यानंतर उमेशने ३६ सोनसाखळी चोरी केल्या. पोलिसांनी पाटील याला २१ ऑक्टोबर रोजी अटक केली. पोलिसांनी ढिकलेसह इतर चार ज्वेलर्सना अटक केली. त्यातील एका ज्वेलर्सबाबत धक्कादायक माहिती समोर आली आहे. त्याची सोनसाखळी चोरांसोबत ‘लिंक’ असल्याचे स्पष्ट झाले आहे. हे सर्व सहा आरोपी सध्या पोलीस कोठडीत आहेत, अशी माहिती पोलिसांनी दिली.
अखेर तो पोलिसांच्या हाती सापडला!
सोनसाखळी चोर उमेश पाटीलचा शोध घेणं अवघड होतं. ढिकले याने त्याची साथ सोडल्याने तो एकटाच चोऱ्या करायचा. आपल्याला कुणी पकडू शकत नाही, असे उमेशला वाटायचं. मात्र, गुन्हा कधीच लपत नाही. अखेर उमेश पोलिसांच्या हाती सापडला.
मुंबईत काम करणाऱ्या सुरक्षारक्षकाचा मुलगा
उमेश पाटील याचे वडील सुरक्षा रक्षक आहेत. ते मुंबईत काम करतात. उमेश पाटील याने शहरातील कॉलेजमधून आपले इंजिनीअरिंगचे शिक्षण पूर्ण केले आहे. पाटील हा एका कंत्राटदाराकडे नोकरी करत होता. मात्र, समाधानकारक पगार मिळत नसल्याने त्याने सोनसाखळी चोरीचा मार्ग निवडला. वरिष्ठ पोलीस निरीक्षक रियाज शेख यांच्या नेतृत्वाखाली गंगापूर पोलिसांनी पाटील याला अटक केली. सीसीटीव्ही फुटेजच्या आधारे मिळालेल्या पुराव्यांच्या आधारे त्यांनी सापळा रचून पाटील याला बेड्या ठोकल्या.
२७ सोन्याच्या चेन आणि अडीच लाखांची रोकड सापडली
पोलिसांना चौकशीदरम्यान, पाटील याच्या घरातून २७ सोनसाखळी आणि अडीच लाखांची रोकड असा एकूण २९.३२ लाखांचा ऐवज सापडला. चोरीच्या सोनसाखळी विकण्यासाठी पाटील हा सोन्याचा भाव वधारण्याची वाट पाहत असे. उमेश पाटील याने चोरीच्या सोनसाखळी विकून मिळालेल्या पैशांतून ४८ लाख रुपये किंमतीचा फ्लॅट, कार घेतली होती. तर त्याच्या दोन बँक खात्यांमध्ये २० लाख रुपये जमा होते.
Marathi News: मराठी बातम्या, Latest News in Marathi, Breaking Marathi News, Marathi News Paper | Maharashtra Times