हायलाइट्स:
- बसचालकाने विषारी औषध प्राशन करून आत्महत्येचा केला प्रयत्न
- नाशिक जिल्ह्यातील कळवण आगारातील घटना
- सोमवारी रात्रीच्या सुमारास घडली घटना
प्रमोद शिवाजी सूर्यवंशी (रा.वाजगाव ता.देवळा, वय३८) असं आत्महत्येचा प्रयत्न करणाऱ्या बसचालकाचं नाव आहे. याबाबत अधिक माहिती अशी की, कळवण आगारात गेल्या काही वर्षांपासून चालक या पदावर प्रमोद सूर्यवंशी कार्यरत आहेत. ते काही दिवसांपासून सुट्टीवर असल्याने त्यांनी पगारी अर्ज दिला होता. मात्र अर्ज वेळेत मंजूर न झाल्यामुळे दोन हजार असा तुटपुंजा पगार आणि अडीच हजार रुपये दिवाळीचा बोनस असे अवघे साडे चार हजार रुपये मिळाल्याने ते निराश झाले.
घरात आई व पत्नी आजारी असून त्यांच्या उपचाराचा खर्च कसा भागवायचा, तसंच दिवाळीसाठी मुलांना कपडे घेण्यासाठी पैसे नाहीत म्हणून हतबल होऊन विषारी औषध प्राशन करून सूर्यवंशी यांनी जीवनयात्रा संपवण्याचा प्रयत्न केला. मात्र हा प्रकार काही कर्मचाऱ्यांच्या लक्षात आल्याने तात्काळ उपचारासाठी कळवण उपजिल्हा रुग्णालयात दाखल केल्याने सुदैवाने त्यांचे प्राण वाचले आहेत. सध्या त्यांची प्रकृती स्थिर असून धोक्याबाहेर असल्याचंही वैद्यकीय सूत्रांनी सांगितलं आहे.
दरम्यान, याबाबत अधिक तपास कळवण पोलीस ठाण्याचे पोलिस निरीक्षक समाधान नागरे व पोलीस कर्मचारी करत आहेत.
Maharashtra News, Latest Maharashtra News in Marathi, महाराष्ट्र ठळक बातम्या | Maharashtra Times