हायलाइट्स:
- सांगली जिल्ह्यातील एसटी कर्मचाऱ्यांची घोषणा
- बुधवारी पहाटेपासून पुन्हा संप करण्याचा निर्णय घेतला
- ऐन दिवाळीत सांगली जिल्ह्यात होणार प्रवाशांचा खोळंबा
आटपाडी आगारात गेल्या पाच दिवसांपासून एसटी कर्मचाऱ्यांचा संप सुरूच आहे. एसटी कर्मचाऱ्यांच्या या निर्णयामुळे ऐन दिवाळीत सांगली जिल्ह्यात एसटीची चाके थांबणार आहेत.
विविध मागण्यांसाठी एसटी कर्मचाऱ्यांनी राज्यभर संप केला होता. दोन दिवसांपूर्वीच एसटी कर्मचाऱ्यांच्या संघटनांशी झालेल्या चर्चेनंतर राज्य सरकारने कर्मचाऱ्यांच्या मागण्या मान्य केल्या. त्यानंतर राज्यातील काही आगारांचा अपवाद वगळता, बहुतांश ठिकाणी एसटीची सेवा पुन्हा सुरू झाली. मात्र एसटी कर्मचाऱ्यांचे शासनामध्ये विलिनीकरण करावे, या मागणीसाठी अजूनही काही ठिकाणी कर्मचाऱ्यांचे काम बंद आंदोलन सुरूच आहे.
सांगली जिल्ह्यातील आटपाडी तालुक्यात एसटीची सेवा ठप्प आहे, तर आता बुधवारी पहाटेपासून सांगलीतही संप करण्याचा निर्णय एसटी कर्मचाऱ्यांनी घेतला आहे. त्यामुळे ऐन दिवाळीत सांगलीत प्रवाशांना मोठ्या अडचणींना सामना करावा लागणार आहे.
दरम्यान, आटपाडीत एसटी आगाराचे गेट बंद करून निदर्शने केल्याबद्दल भाजपचे आमदार गोपीचंद पडळकर यांच्यासह ७० जणांवर आटपाडी पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे. एसटी कर्मचाऱ्यांच्या मागण्या मान्य केल्या जातील, मात्र त्यांनी ऐन दिवाळीत संप करून प्रवाशांची अडवणूक करू नये, असं आवाहन राज्य सरकारने केलं आहे. मात्र तरीही सांगली जिल्ह्यात एसटी कर्मचारी संपावर ठाम असल्याने प्रवाशांचा खोळंबा होणार आहे.
Maharashtra News, Latest Maharashtra News in Marathi, महाराष्ट्र ठळक बातम्या | Maharashtra Times