मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी आज अयोध्येत जाऊन प्रभू रामाचं दर्शन घेतलं. ठाकरे यांच्या या दौऱ्यावर चंद्रकांत पाटील यांनी सडकून टीका केली आहे. राष्ट्रीय स्वयंसेवक संघाने ९५ वर्षापूर्वीच हिंदू राष्ट्राची सांस्कृतिक संकल्पना मांडली आहे. आमचा हा सांस्कृतिक राष्ट्रवाद उद्धव ठाकरे यांना आधीपासूनच मान्य होता. आता तो जर काँग्रेसलाही मान्य झाला असेल तर आनंदच आहे, असा चिमटा चंद्रकांत पाटील यांनी काढला.
उद्धव ठाकरे यांनी आज अयोध्येत जाऊन रामाचं दर्शन घेतानाच भाजपवर टीकास्त्रही सोडलं होतं. भाजप आणि हिंदुत्व या वेगवेगळ्या गोष्टी आहेत. आम्ही भाजपपासून बाजुला झालो आहोत, हिंदुत्वापासून नाही, असं सांगत भाजप म्हणजे हिंदुत्व नव्हे. हिंदुत्व वेगळं आहे आणि भाजप वेगळं आहे, असं उद्धव ठाकरेंनी ठासून सांगितलं होतं. थेट उत्तर प्रदेशात जाऊन उद्धव ठाकरे यांनी हिंदुत्वाच्या मुद्द्यावरून भाजपला फटकारल्याने भाजपचा तिळपापड झाला आहे. ठाकरे यांच्या या विधानानंतर भाजपकडून त्यांच्यावर टीका होत असून चंद्रकांत पाटील यांनीही त्यांच्यावर निशाणा साधला आहे.
Marathi News: मराठी बातम्या, Latest News in Marathi, Breaking Marathi News, Marathi News Paper | Maharashtra Times