कोल्हापूर : जपानची राजधानी टोकिओ येथे झालेल्या पॅराऑलिम्पिक स्पर्धेत १० मीटर एअर रायफल क्रीडा प्रकारात चौथा क्रमांक पटकावणाऱ्या कोल्हापूरच्या स्वरुप महावीर उन्हाळकर या खेळाडूचा आयुर्विमा मंडळाने (एलआयसी) कोल्हापूर विभागाच्या वतीने १० लाख रुपये देऊन गौरव केला. दीपावलीच्या पूर्वसंध्येला १० लाख रुपयांची मदत मिळाल्याने स्वरुपने खऱ्या अर्थाने धनत्रयोदशी साजरी केली.

पॅराऑलिम्पिक स्पर्धेत सुवर्णपदक विजेत्याला एलआयसीने एक कोटी रुपये, रौप्य पदक विजेत्याला ५० लाख, ब्राँझ पदक विजेत्याला २५ लाख तर चौथा क्रमांक मिळवणाऱ्याला १० लाख रुपये जाहीर केले होते. पॅराऑलिंपिक स्पर्धेत भारताने पाच सुवर्णपदकासह १९ पदके पटकावली. ज्यांना पदक मिळाले नाही पण चांगले प्रदर्शन केले, अशा खेळाडूंचा एलआयसीने गौरव केला. शूटिंगमध्ये दहा मीटर एअर रायफलमध्ये स्वरुपचे ब्राँझ पदक थोडक्यात हुकले आणि त्याला चौथ्या स्थानावर समाधान मानावे लागले. पण त्याच्या यशाचे कौतुक करताना एलआयसीने १० लाख रुपयांचा धनादेश देऊन त्याच्या खात्यावर पैसे वर्ग केले.

मुंबई-कोकण अंतर होणार कमी? एकनाथ शिंदे यांनी केली मोठी घोषणा

स्टेशन रोडवरील एलआयसीच्या कार्यालयात मंगळवारी एका कार्यक्रमात एलआयसी कोल्हापूर विभागाचे मंडल प्रबंधक अभय कुलकर्णी यांच्या हस्ते स्वरुप उन्हाळकरला १० लाख रुपयांचा धनादेश, मानपत्र, सन्मानचिन्ह प्रदान करण्यात आले. एलआयसीच्या वतीने देशभरातील खेळाडूंना मदत केली असून महाराष्ट्रातून एकमेव मदत स्वरुप उन्हाळकरला झाली आहे. एलआयसीने केलेल्या गौरवाबद्दल स्वरुपने आभार मानत एलआसीने केलेल्या भरीव मदतीचा निश्चित फायदा होईल, अशी आशा व्यक्त करत पुढील पॅराऑलिम्पिकमध्ये पदक मिळवण्याचा विश्वास व्यक्त केला.

दरम्यान, यावेळी शिवछत्रपती पुरस्कार विजेते विजय जाधव, स्वरुपचे प्रशिक्षक रमेश कुसाळे, सेल्स मॅनेजर प्रमोद गुळवणी, उमेश दिवेकर उपस्थित होते.

Marathi News: मराठी बातम्या, Latest News in Marathi, Breaking Marathi News, Marathi News Paper | Maharashtra Times

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here