महाबळेश्वर: अंगणात खेळणाऱ्या मुलांना मारहाण करून त्यांना पळवून नेण्याच्या तयारीत असलेल्या तीन तृतीयपंथीयांच्या टोळीला पोलिसांनी अटक केली आहे. मुलांनी आरडाओरड केल्यामुळे या तिघा तृतीयपंथीयांना अटक करण्यात आली. हे तिघेही मुंबईचे राहणारे असून त्यांनी आणखी मुलांना पळविले का? याचा पोलीस कसून शोध घेत आहेत.

आज दुपारी सव्वा बाराच्या सुमारास हा प्रकार घडला. महाबळेश्वर येथील बौद्ध वस्तीच्या परिसरात ७ ते १० वयोगटातील काही मुले खेळत होती. त्यावेळी लक्ष्मण शंकर क्ल्लेमोर (वय ५०), बसुराज सायाप्पा कडमिची (वय २५) आणि रमेश सिद्धराम टेकूल (वय २८) या तिघांनी या मुलांना मारहाण करून पळवून नेण्याचा प्रयत्न केला. अचानक सुरू झालेल्या मारहाणीमुळे या मुलांनी जीवाच्या आकांताने आरडाओरड केली. त्यामुळे परिसरातील नागरिकांनी तात्काळ घटनास्थळी धाव घेऊन तृतीयपंथीयांच्या तावडीतून या मुलांना सोडवण्याचा प्रयत्न केला. मात्र, त्यांनी गावकऱ्यांनाही मारहाण सुरू केली. या झटापटीत या मुलांना जखमा झाल्या. मात्र, त्यांना तृतीयपंथीयांच्या तावडीतून सोडवण्यात स्थानिकांना यश आले. या प्रकारामुळे धस्तावलेल्या मुलांच्या पालकांनी तात्काळ महाबळेश्वर पोलीस ठाण्यात धाव घेतली. पालकांसोबत नागरिकांनीही पोलीस स्टेशनबाहेर प्रचंड गर्दी केल्याने पोलिसांनीही तात्काळ घटनास्थळी धाव घेऊन महाबळेश्वर एसटी स्टँडवरून पळून जाण्याच्या तयारीत असलेल्या तृतीयपंथीयांना ताब्यात घेतले.

या तिन्ही तृतीयपंथीयांविरोधात भादंवि कलम ३६३, ३२३, ५११, ३४ अन्वये गुन्हा दाखल केला असून त्यांना अटक केली आहे. हे तिघेरी सोलापूरच्या यालम्मा पेठ येथील मूळचे रहिवासी आहेत. सध्या चेंबूर येथील छेडा नगर परिसरात ते राहतात. पोलिसांनी या तिघांचीही कसून चौकशी सुरू केली असून त्यांनी इतरही मुलांना पळवून नेलं का? याची चौकशी करण्यात येत आहे. महाबळेश्वर पोलीस ठाण्याचे पोलीस निरीक्षक बंडोपंत कोंडूभौरी यांच्या मार्गदर्शनाखाली म.पो.ना. सुरखा चव्हाण या प्रकरणाचा अधिक तपास करत आहेत. दरम्यान, आज झालेल्या प्रकारामुळे महाबळेश्वरमध्ये दहशतीचे वातावरण निर्माण झाले आहे. महाबळेश्वर पर्यटन स्थळ असल्याने या ठिकाणी हजारो पर्यटक येत असतात. अशावेळी तृतीयपंथीयांना या ठिकाणी येण्यापासून मज्जाव करण्यात यावा, अशी मागणी स्थानिकांकडून केली जात आहे.

Marathi News: मराठी बातम्या, Latest News in Marathi, Breaking Marathi News, Marathi News Paper | Maharashtra Times

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here