हायलाइट्स:
- ग्लासगोमध्ये पंतप्रधान मोदी आणि इस्राईलचे पंतप्रधान नफ्ताली बेनेट यांची भेट
- पंतप्रधान नफ्तालींकडून मोदींना अजब-गजब ऑफर
- व्हिडिओ सोशल मीडियावर व्हायरल
पंतप्रधानांच्या ब्रिटन दौऱ्यादरम्यान जगातील अनेक नेत्यांशी त्यांची भेट आणि चर्चा झाली. यावेळी अनेक गंमतीशीर प्रसंगही नरेंद्र मोदींच्या वाट्याला आले. इस्राईलचे पंतप्रधान नफ्ताली आणि मोदी यांच्यातील अशाच एका अनौपचारिक संवादाचा एक व्हिडिओ सोशल मीडियावर व्हायरल होतोय. या व्हिडिओत नफ्ताली पंतप्रधान मोदींच्या लोकप्रियतेचं कौतुक करतानाच त्यांना आपल्या देशात येऊन थेट आपल्या पक्षाच्या उमेदवारीचीच अजब-गजब ऑफर देताना दिसत आहेत.
मीडियाला सामोरं जाताना दोन्ही नेत्यांनी एकमेकांचं हसत-खेळत स्वागत केलं. यावेळी, नफ्ताली यांनी मोदींना ‘तुम्ही इस्राईलमध्येही सर्वात लोकप्रिय व्यक्ती आहेत. या आणि आमच्या पक्षात सहभागी’ व्हा असं पंतप्रधान मोदींना उद्देशून म्हटलं. यावर, पंतप्रधान मोदींनीही खळखळून हसत पंतप्रधान नफ्ताली यांच्या विनोदबुद्धीला दाद दिली.
COP26 Summit : पंतप्रधान नरेंद्र मोदींनी जगभरातील नेत्यांची अशी घेतली भेट
PHOTO : पंतप्रधान मोदींकडून पोप फ्रान्सिस यांना भारतात येण्याचं निमंत्रण
ग्लासगो येथील सीओपी – २६ हवामानबदल शिखर परिषदेत जगभरातील अनेक नेते सहभागी झाले होते. औपचारिकरित्या संमेलनाला सुरूवात होण्यापूर्वी नफ्ताली आणि मोदी यांची भेट झाली. या द्विपक्षीय चर्चेत दोन्ही नेत्यांनी अनेक गंभीर मुद्यांवरही चर्चा केली. सोबतच, दोन्ही नेत्यांनी एकमेकांशी हसत-खेळत संवादही साधला.
बोरिस जॉन्सन आणि नरेंद्र मोदींची भेट
दरम्यान, ग्लासगो हवामान परिषदे दरम्यान ब्रिटनचे पंतप्रधान बोरिस जॉन्सन आणि पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्यात दहशतवादाला विरोध आणि फुटिरतावादी गटाकडून सुरू असलेल्या अतिरकी कारवायांवर चर्चा झाली. ‘दोन्ही नेत्यांमध्ये अगदी थोडा वेळ बैठक झाली. पण, यामध्ये दोन्ही देशांना वाटणाऱ्या चिंतांबद्दल, वाढत्या मूलतत्त्ववादाबद्दल चर्चा झाली,’ असं परराष्ट्र सचिव हर्ष वर्धन शृंगला यांनी सांगितलं. ब्रिटनमध्ये खलिस्तानी प्रवृत्तीच्या लोकांना मिळत असलेल्या पाठिंब्याची पार्श्वभूमी यामागे होती. दोन्ही देशांच्या राष्ट्रीय सुरक्षा सल्लागारांमध्ये बुधवारी सविस्तर चर्चा होणार आहे. विजय मल्ल्या आणि नीरव मोदी यांच्या प्रत्यार्पणाबाबत सुरक्षा सल्लागारांच्या बैठकीत चर्चा होईल.
Marathi News: मराठी बातम्या, Latest News in Marathi, Breaking Marathi News, Marathi News Paper | Maharashtra Times