हायलाइट्स:
- बीडमधील परळी परिसरातून ऑक्टोबरमध्ये एका आठवड्यात १२५ गाढवं चोरीला
- मालक आणि कामगारांच्या तक्रारीवरून बीड पोलीस करताहेत तपास
- तपास कोणत्या दिशेने सुरू? पोलिसांनी दिली माहिती
- अचानक गायब झालेल्या गाढवांची बाजारात किंमत लाखोंच्या घरात
परळी शहर पोलीस ठाण्याचे निरीक्षक उमाशंकर कस्तुरे यांनी ‘टाइम्स ऑफ इंडिया’शी बोलताना सांगितले की, आमच्या पोलीस ठाण्याच्या हद्दीतील जवळपास ५५ ते ६० गाढवं चोरीला गेली आहेत. परळीच्या ग्रामीण भागातील आणि संभाजीनगर पोलीस ठाण्याच्या हद्दीतून इतर गाढवं चोरीला गेली आहेत. परळीत काही सीसीटीव्ही कॅमेरे लावण्यात आलेले आहेत. त्या सीसीटीव्हीमधील फुटेजच्या माध्यमातून तपास करण्यात येत आहे, असेही पोलिसांनी सांगितले.
परळी तालुक्यात ठिकठिकाणी मोठ्या संख्येने वीट भट्ट्या आहेत. या वीट भट्ट्यांवर काम करणारे कामगार आणि इतर मालक मालवाहतुकीसाठी गाढवांचा वापर करतात. या ठिकाणी अनेक वर्षांपासून काही जण वीट भट्टीचा व्यवसाय करतात. विटा तयार करण्यासाठी लागणारा कच्चा माल वाहून नेण्यासाठी गाढवांचा वापर केला जातो. मात्र, या वीटभट्टी व्यावसायिक आणि कामगारांना गेल्या ऑक्टोबर महिन्यात मोठा फटका बसला आहे. गेल्या महिन्यात शेवटच्या आठवड्यात या परिसरातून जवळपास सव्वाशे गाढवं चोरीला गेली आहेत.
या प्रकरणी काही मालकांनी पोलीस ठाण्यांमध्ये तक्रारी दाखल केल्या आहेत. काही जणांनी सांगितले की, एका गाढवाची किंमत २५ ते ५० हजारांच्या दरम्यान आहे. चोरीला गेलेल्या गाढवांची किंमत लाखोंच्या घरात आहे. येथील ३४ वीट भट्ट्यांवरील मालक आणि कामगारांची जवळपास १२५ गाढवं काही दिवसांत चोरीला गेली आहेत. स्थानिक नागरिकाने सांगितले की, या भागात जवळपास ५०० ते ७०० गाढवं आहेत. पण मोठ्या मुश्किलीने काही जणांनीच आपल्याकडे असलेल्या या प्राण्यांची संबंधित विभागाकडे नोंदणी केलेली आहे. या ठिकाणी मालवाहतुकीसाठी गाढवांचा वापर केला जातो. त्यामुळे येथे गाढवांना खूपच किंमत आहे. याशिवाय दूधालाही मोठी मागणी आहे, असेही काहींनी सांगितले. मालक आणि कामगारांनी नोंदवलेल्या तक्रारींनुसार, पोलीस अचानक गायब झालेल्या या गाढवांचा शोध घेत आहेत. त्यासाठी सीसीटीव्ही फुटेजचा आधार घेतला जात आहे. मात्र, शेकडोंच्या संख्येने बेपत्ता झालेली गाढवं गेली कुठे, असा प्रश्न निर्माण झाला आहे.
Marathi News: मराठी बातम्या, Latest News in Marathi, Breaking Marathi News, Marathi News Paper | Maharashtra Times