सांगली : तासगाव शहरासह तालुक्याला बुधवारी पहाटेच्या सुमारास अवकाळी पावसाने झोडपले. जोरदार पावसामुळे ओढे, नाले दुथडी भरून वाहू लागले आहेत, तर काही ठिकाणी ओढ्याच्या पुलांवरून पाणी गेल्याने वाहतूक खोळंबली. दरम्यान, अवकाळी पावसामुळे द्राक्षबागांचे मोठे नुकसान झाले आहे. हवामान विभागाने आणखी चार दिवस पावसाचा अंदाज व्यक्त केल्याने द्राक्ष बागायतदार हवालदिल झाले आहेत.
सांगली जिल्ह्यात गेल्या दोन दिवसांपासून ढगाळ वातावरण होते. बुधवारी पहाटे ढगांच्या गडगडाटासह पावसाने हजेरी लावली. तासगाव शहरासह परिसरात पडलेल्या मुसळधार पावसाने सर्वत्र पाणी-पाणी झाले. अवकाळी पावसामुळे द्राक्ष बागांचे मात्र मोठे नुकसान झाले आहे. सध्या द्राक्ष बागा विरळणी, फ्लावरिंग स्टेजला आहेत. या महत्त्वाच्या टप्प्यात पाऊस, धुके व ढगाळ हवामानामुळे डाऊनी रोगाचा प्रादुर्भाव वाढला आहे. पावसाने द्राक्षांचे घड कुजून गेलेत, तर डाऊनी रोगाच्या फैलावाने हजारो हेक्टर क्षेत्रावरील द्राक्ष बागा धोक्यात आल्या आहेत. द्राक्ष बागा वाचवण्यासाठी शेतकऱ्यांकडून महागड्या औषधांची फवारणी केली जात आहे. मात्र, अनेक कंपन्यांची औषधे परिणामकारक नसल्याने शेतकऱ्यांना नुकसान सोसावे लागत आहे. दिवाळीच्या सुट्ट्यांमध्ये देवदर्शनाला निघताय तर आधी वाचा ही बातमी, शिर्डीसह ‘या’ मंदिरांमध्ये नवे नियम बुधवारी पहाटे झालेल्या पावसामुळे तासगाव परिसरातील ओढे, नाले दुथडी भरून वाहत आहेत. काही ठिकाणी ओढ्यांच्या फुलांवरून पाणी वाहत आहे. मणेराजुरी-शिरढोण या राज्य महामार्गावर माणेराजुरी गावानजीक पुलावर पुराचे पाणी आल्याने हा मार्ग वाहतुकीसाठी काही तास बंद राहिला. तर मणेराजुरी-करोली रस्ता पाण्याखाली गेल्याने वाहतूक काही काळ बंद होती.