हायलाइट्स:
- हायकोर्टाच्या निर्णयाने एसटी कर्मचाऱ्यांना धक्का
- संप करण्यास केली मनाई
- मुंबई हायकोर्टाने दिला अंतरिम आदेश
एसटी महामंडळाने अॅड. जी. एस. हेगडे यांच्यामार्फत तातडीने याचिका दाखल करत न्या. शाहरुख काथावाला व न्या. सुरेंद्र तावडे यांच्या खंडपीठाला संध्याकाळी ५ वाजता विषयाचे गांभीर्य सांगितले. त्यानंतर पुन्हा रात्री ८ च्या सुमारास याविषयी प्राथमिक सुनावणी झाल्यानंतर खंडपीठाने महामंडळाच्या सर्व कर्मचाऱ्यांना संपावर जाण्यापासून मनाई करणारा आदेश काढला.
एसटी महामंडळ राज्य सरकारमध्ये विलीन करण्यासह विविध मागण्या संघटनांनी केल्या आहेत. एसटी महामंडळाने औद्योगिक न्यायालयात अर्ज दाखल केला होता. एसटी सेवा ही अत्यावश्यक सेवा असल्याने औद्योगिक न्यायालयाने २९ ऑक्टोबरच्या आदेशाने कर्मचाऱ्यांना संपावर जाण्यास मनाई केली होती. तरीही संघटनांनी संपाची भूमिका घेतल्याने महामंडळाने तातडीने रिट याचिकेद्वारे हायकोर्टात धाव घेतली.
‘सध्या दिवाळीच्या सणासुदीचा काळ असूनही काही संघटना संपावर जात असून यामुळे नागरिकांचे खूप हाल होणार आहेत. शिवाय औद्योगिक न्यायालयाचा आदेश टाळून संघटनांनी संपाची भूमिका घेतली असून त्याविषयी महामंडळाला आजच नोटीस देण्यात आली आहे’, असं हेगडे यांनी निदर्शनास आणले. त्याची दखल घेत खंडपीठाने महामंडळाच्या सर्व कर्मचाऱ्यांना बुधवारी मध्यरात्रीपासून आणि कोर्टाच्या पुढील आदेशापर्यंत संपावर जाण्यास मनाई करून गुरुवारी (४ नोव्हेंबर) सकाळी ११ वाजता याप्रश्नी पुन्हा सुनावणी ठेवली.
एसटी महामंडळाच्या कर्मचाऱ्यांच्या संपाचा गोंधळ
महागाई भत्त्यातील वाढीसह विविध मागण्यांसाठी काही दिवसांपूर्वी एसटी महामंडळाच्या कर्मचाऱ्यांनी राज्यव्यापी संप पुकारला होता. कर्मचाऱ्यांच्या संपामुळे एसटी सेवा ठप्प झाली आणि राज्यभरात नागरिकांना प्रवासासाठी ऐनवेळी पर्यायी वाहन शोधावे लागले. प्रवाशांचा मोठा खोळंबा झाल्यानंतर राज्याचे परिवहन मंत्री अनिल परब यांच्यासोबत एसटी कर्मचाऱ्यांच्या संघटनेची बैठक झाली आणि या बैठकीनंतर तोडगा निघाला.
सरकारने काही मागण्या मान्य केल्यानंतर एसटी कर्मचारी संघटनेनं संप मागे घेण्याची घोषणा केली. प्रत्यक्षात मात्र अनेक आगारांतील कर्मचाऱ्यांनी संप सुरूच ठेवण्याची भूमिका घेतली. एसटी कर्मचाऱ्यांचं विलिनीकरण राज्य सरकारमध्ये करावं, अशी मागणी करत या कर्मचाऱ्यांनी काम बंद आंदोलन करण्याचा निर्णय घेतला. त्यामुळे पुन्हा एकदा ऐन सणासुदीत प्रवाशांचे हाल सुरू झाले होते.
महामंडळाने कर्मचाऱ्यांना काय आवाहन केलं?
एसटी कर्मचाऱ्यांच्या संपामुळे या वाहतूक सेवेवर अवलंबून असलेल्या प्रवाशांची गैरसोय होत आहे. या पार्श्वभूमीवर एसटी महामंडळाने कर्मचाऱ्यांना महत्त्वपूर्ण आवाहन केलं आहे. ‘सर्व एसटी कामगारांना ऑक्टोबरचे वेतन दिवाळीच्या पहिल्याच दिवशी, सोमवारी देण्यात आले. सुधारित महागाई भत्ता, घरभाडे आणि दिवाळी भेट असे या वेतनाचे स्वरूप आहे. सध्या ८५ टक्के वाहतूक सुरू आहे. दिवाळीत प्रवाशांची गैरसोय टाळण्यासाठी कर्मचाऱ्यांनी कामावर रुजू व्हावे,’ असं आवाहन एसटी महामंडळाने आपल्या कर्मचाऱ्यांना केलं आहे.
Maharashtra News, Latest Maharashtra News in Marathi, महाराष्ट्र ठळक बातम्या | Maharashtra Times