हायलाइट्स:

  • खून प्रकरणात धक्कादायक खुलासा
  • अल्पवयीन मुलांनी महिलेचा खून केल्याचं पोलीस तपासात स्पष्ट
  • सीआयडी मालिका पाहून पैसे चोरण्यासाठी केला खून

पुणे : पुण्यातील ७० वर्षीय वृद्ध महिलेच्या खून प्रकरणात धक्कादायक खुलासा झाला आहे. पैसे चोरण्यासाठी दोन अल्पवयीन मुलांनी या महिलेचा खून केल्याचं पोलीस तपासात स्पष्ट झालं आहे. या गुन्ह्याप्रकरणी पोलिसांनी ताब्यात घेतलेल्या एका मुलाचं वय १४ वर्ष तर दुसऱ्याचं १६ वर्ष इतकं आहे.

सिंहगड रस्ता परिसरातील हिंगणे येथे घरात घुसलेल्या चोरट्यांनी ७० वर्षीय शालिनी बबन सोनावणे यांचा खून करून पावणेदोन लाख रुपयांचे दागिने चोरून नेले होते. मात्र, सोनावणे यांच्या अंगावरील चार ते पाच तोळे सोने तसेच होते. हा प्रकार शनिवारी सकाळी ११ ते रात्री १० या वेळेत घडला होता.

प्रतिक काळे आत्महत्या प्रकरण: मंत्री शंकरराव गडाख म्हणतात, ‘मी दोषी असेन तर…’

सोनावणे या घरात एकट्याच राहत होत्या. तर, त्यांच्या समोरील सोसायटीत त्यांचा मुलगा राहत होता. मुलगा रात्री आईकडे आला, तेव्हा हा प्रकार उघड झाला. मुलाने दिलेल्या तक्रारीवरून या प्रकरणी सिंहगड रोड पोलीस ठाण्यात अज्ञाताविरोधात गुन्हा दाखल करून आरोपींचा शोध सुरू करण्यात आला होता. मात्र हा प्रकार घडला त्या परिसरात सीसीटीव्ही कॅमेरे किंवा प्रत्यक्षदर्शी साक्षीदार नसल्याने या प्रकरणाचा उलगडा करण्यात पोलिसांना अडचणी येत होत्या.

पोलिसांनी या घटनेच्या तपासादरम्यान या परिसरातील लहान मुलांशी चर्चा केली. या मुलांनी पोलिसांना सांगितलं की घटनेच्या दिवशी आमचे दोन मित्र पाणीपुरी खाण्यासाठी गेल्यानंतर पाणीपुरी न खाताच गडबडीने माघारी आले होते. त्यानंतर पोलिसांनी या संशयित मुलांना ताब्यात घेतलं आणि त्यांची चौकशी करण्यास सुरुवात केली. सुरुवातीला या मुलांनी उडवाउडवीची उत्तरे दिली, मात्र नंतर पोलिसी खाक्या दाखवताच गुन्हा कबुल केला.

दरम्यान, सीआयडी मालिका पाहून पैसे चोरण्यासाठी आम्ही या महिलेचा खून केल्याचं या दोन अल्पवयीन मुलांना मान्य केलं आहे. पोलिसांनी सदर आरोपींना ताब्यात घेतलं असून पुढील तपास करण्यात येत आहे.

Maharashtra News, Latest Maharashtra News in Marathi, ‎महाराष्ट्र ठळक बातम्या | Maharashtra Times

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here