हायलाइट्स:
- पुण्यातील त्या वृद्धेच्या हत्येचा अखेर उलगडा
- शेजारील दोन अल्पवयीन मुलांनी रचला होता कट
- टीव्हीवरील क्राइम शो बघून केले कृत्य
- हिंगणे खुर्द परिसरात एकटीच राहत होती वृद्ध महिला
नरवीर तानाजी मालुसरे रस्त्यावरील (सिंहगड रस्ता) हिंगणे खुर्द परिसरात एकट्या राहणाऱ्या शालिनी बबन सोनावणे यांचा अज्ञाताने खून केल्याची धक्कादायक बाब ३१ ऑक्टोबरला रात्री दहाच्या सुमारास उघड झाली होती. त्यांच्या घरातून पावणेदोन लाख रुपयांचे दागिने चोरण्यात आले आहेत. या प्रकरणी त्यांचा मुलगा विराट बबन सोनावणे (वय ३९, रा. हिंगणे खुर्द) यांनी सिंहगड रोड पोलिस ठाण्यात तक्रार दिली होती.
दरम्यान, या गुन्ह्याचा तपास करताना पोलिसांना अनेक अडथळ्यांचा सामना करावा लागला. घटनास्थळी कोणताही सीसीटीव्ही कॅमेरा नव्हता. तसेच, प्रत्यक्षदर्शीही नव्हता. त्यामुळे वेगवेगळ्या दृष्टीकोनातून तपासाची चाचपणी सुरू होती. या दरम्यान मंगळवारी (२ नोव्हेंबर) तपास पथकातील पोलिस अंमलदार उज्जल मोकाशी यांना घटनास्थळाजवळील रोकडोबा मंदिरा येथील लहान मुलांकडुन माहिती मिळाली की, ३० ऑक्टोंबर रोजी दुपारी पाणीपुरी खायला जाताना, त्यांचे दोन मित्र पाणीपुरी न खाताच परत गडबडीने घरी आले होते. त्यावरून पोलिसांनत्त्या परिसरातील सीसीटीव्ही कॅमेऱ्यांचे फुटेज तपासले. त्यात दोन मुले अत्यंत घाईने जात असल्याचे दिसून आले. पोलिसांनी त्यांना चौकशीसाठी बोलावून घेतले. त्यावेळी दोन्ही मुलांनी उडवाउडवीची उत्तरे दिली. त्यामुळे त्यांच्यावरील संशय बळावला होता. पोलिस कर्मचाऱ्यांनी त्यांच्याबाबत अधिक माहिती घेतली असता, एका मुलाला स्वःतच्या घरामध्ये चोरी करण्याची सवय असल्याचे समोर आले. त्यांच्याकडे कसून तपास केल्यानंतर त्यांनी गुन्हा केल्याचे कबुल दिली.
‘क्राइम शो’ पाहून रचला बनाव
दोन्ही अल्पवयीन मुले मृत वृद्धेच्या घराशेजारीच राहतात. त्यामुळे त्यांचे महिलेच्या घरी येणे-जाणे होते. वृद्धेच्या पैसे असून, त्या पैसे कोठे ठेवतात, याबाबत त्या मुलांना माहिती होती. यासाठी त्या दोघांनी दोन महिन्यांपूर्वी टीव्हीवरील क्राइम शो पाहून चोरीचा कट रचला होता. त्यासाठी त्यांनी दोन महिन्यापूर्वी महिलेच्या घराची चावी चोरली होती. मात्र, संबंधित वृद्ध महिला घर सोडून कोठही जात नसल्याने त्यांना चोरी करता आली नाही. मात्र, ३० तारखेला महिला घरात एकट्या असताना त्यांनी घरात प्रवेश केला. यावेळी महिला टीव्ही पाहत होत्या. महिलेसोबत या दोघांनीही टीव्ही पाहण्याचा बनाव केला. काही वेळात महिलेला पाठीमागून धक्का देत खाली पाडले. त्यानंतर त्यांचा खून केला. या मुलांनी घरातील सोन्याचे दागिने, रोकड असा एक लाख ६० हजारांचा मुद्देमाल चोरून, तेथून पळ काढला. घटनास्थळी बोटांचे ठसे उमटू नयेत, म्हणून दोघांनी हॅण्डग्लोज घातलेले होते, अशी माहिती सिंहगड रोड पोलिसांनी दिली.
Marathi News: मराठी बातम्या, Latest News in Marathi, Breaking Marathi News, Marathi News Paper | Maharashtra Times