हायलाइट्स:
- पुण्यातील पिंपरी-चिंचवड परिसरात धक्कादायक घटना
- पत्नीशी अनैतिक संबंध असल्याच्या संशयावरून तरुणाची हत्या
- हत्येनंतर मृतदेह दारूच्या भट्टीत जाळला
- हत्येच्या घटनेचा ‘असा’ झाला उलगडा
या हत्येच्या घटनेचा उलगडा वरिष्ठ पोलीस निरीक्षक बाळकृष्ण सावंत यांच्या नेतृत्वाखालील पथकाने केला. या प्रकरणात तीन जणांना अटक केली आहे. तरुणाच्या आईने २२ ऑक्टोबरला तो बेपत्ता झाल्याची तक्रार केली होती.
या प्रकरणाचा हिंजेवाडी पोलीस तपास करत होते. ‘काही हाडे आणि एक मेटल रॉड घटनास्थळावरून हस्तगत करण्यात आला आहे. काही वर्षांपूर्वी अपघातानंतर मृत व्यक्तीच्या पायात मेटल रॉड लावण्यात आला होता,’ अशी माहिती पिंपरी-चिंचवड पोलिसांनी दिली.
असा रचला हत्येचा कट
पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, आरोपींपैकी एका संशयिताच्या पत्नीचे त्या तरूणाशी अनैतिक संबंध असल्याचा संशय होता. २१ ऑक्टोबरच्या रात्री आरोपीने त्याच्या पत्नीच्या मोबाइलवर दोन मिस्ड कॉल बघितले. ते त्या तरुणाच्या मोबाइलवरून आले होते. यावरून त्याने पत्नीला जाब विचारला. त्यानंतर ती घरातून पळून गेली. त्याच रात्री तो तरूण तिला भेटण्यासाठी गेला. त्याचवेळी आरोपी आणि त्याच्या इतर दोन साथीदारांनी त्याला मारहाण केली. त्यानंतर त्याच्यावर धारदार शस्त्राने वार केले. त्याला त्याच अवस्थेत उरवडे येथे नेले आणि तेथे त्याची हत्या केली. तेथे आरोपींनी मृतदेह एका दारूच्या हातभट्टीमध्ये टाकला. मध्य प्रदेशात पळून जाण्यापूर्वी त्यांनी पोलिसांची दिशाभूल करण्याचा प्रयत्न केला.
आईने मुलाची चप्पल बघितली आणि संशय बळावला
तरूणाच्या आईने आपला मुलगा बेपत्ता झाल्याची तक्रार पोलिसांत दिली होती. तिने तिघांवर संशय व्यक्त केला होता. या तीन आरोपींपैकी एक जण हा बावधनमध्ये राहतो. त्याच्या घराबाहेर मुलाची चप्पल तिने बघितली होती. त्यावरून संशय बळावला आणि या घटनेचा उलगडा झाला. दरम्यान, त्यांच्या तिसऱ्या साथीदाराला पोलिसांनी ताब्यात घेतल्यानंतर त्याने कबुली दिली. त्याच्या माहितीवरून पोलीस घटनास्थळी पोहोचले. पोलिसांनी बॅग ताब्यात घेतल्या. त्यात त्यांना मृतदेहाचे अवशेष आणि त्यासोबत शेळीचे अवशेषही सापडले. दोघांना मध्यप्रदेशातून अटक करण्यात आली आहे, अशी माहितीही पोलिसांनी दिली.
Marathi News: मराठी बातम्या, Latest News in Marathi, Breaking Marathi News, Marathi News Paper | Maharashtra Times