हायलाइट्स:
- उत्तर प्रदेशातील बिजनौर येथील प्राध्यापिकेच्या हत्येचा उलगडा
- पतीनेच गुंडांकरवी घडवून आणली हत्या
- पतीने गुंडांना दिली होती साडेपाच लाखांची सुपारी
- शहरातील साकेत कॉलनी परिसरात घडली होती थरारक घटना
या हत्याकांडातील शार्पशूटरची ओळख पटली असून, राजू सिंह असे त्याचे नाव आहे. त्याचा एक साथीदार गोलू हा फरार झाला आहे. पोलिसांनी त्याच्याबद्दल माहिती देणाऱ्यांसाठी २५ हजार रुपयांचे बक्षीस जाहीर केले आहे. प्राध्यापिका प्रिया यांचा पती कमल शर्मा हा सध्या फरार आहे, अशी माहिती पोलिसांनी दिली. पोलिसांनी या प्रकरणी हत्येचा गुन्हा दाखल केला आहे. या दाम्पत्यामध्ये घरगुती वाद सुरू होते. त्यावरून तिची हत्या झाली असावी, असा अंदाज व्यक्त केला जात आहे. गुन्हा घडला त्याच्या आदल्या दिवशीच प्रिया यांनी पतीविरोधात चांदपूर पोलीस ठाण्यात हुंड्यासाठी छळ केल्याची तक्रार दाखल केली होती.
बिजनौरचे पोलीस अधीक्षक धर्मवीर सिंह यांनी सांगितले की, ‘मंगळवारी रात्री नेहमीप्रमाणे पोलिसांनी गस्त घातली होती. वाहनांची तपासणी केली जात होती. त्याचवेळी दुचाकीवरून आलेल्या दोघांना पोलिसांनी थांबण्यास सांगितले. मात्र, त्यांनी धूम ठोकण्याचा प्रयत्न केला. पोलिसांनी अडवण्याचा प्रयत्न केला असता, दोघांनी त्यांच्यावर गोळीबार केला. प्रत्युत्तरादाखल पोलिसांनी केलेल्या गोळीबारात राजू हा पायाला गोळ्या लागल्याने जखमी झाला. मोरादाबादमध्ये राहणारा त्याचा साथीदार गोलू हा पसार झाला. या चकमकीत पोलीस कॉन्स्टेबल मोनू कुमार हे जखमी झाले होते.’
शार्पशूटर राजू याच्याविरोधात अनेक गुन्हे विविध पोलीस ठाण्यांमध्ये दाखल आहेत. रुग्णालयात दाखल केलेल्या राजूने धक्कादायक माहिती दिली. प्रिया यांच्या हत्येसाठी पती कमल शर्मा याने साडेपाच लाख रुपये दिले होते, असे राजू याने पोलिसांना सांगितले, अशी माहितीही पोलिसांनी दिली.
प्रिया यांची २९ ऑक्टोबर रोजी शहरातील उच्चभ्रू वस्ती असलेल्या साकेत कॉलनी परिसरात गोळ्या घालून हत्या झाली होती. स्थानिकांच्या माहितीनुसार, गोळीबाराचा आवाज ऐकल्यानंतर घरातून बाहेर पडलो असता, प्रिया या जखमी अवस्थेत जमिनीवर पडल्या होत्या. काहींनी दुचाकीवरून दोघांना जाताना बघितले होते. प्रिया यांचा जागीच मृत्यू झाला होता.
Marathi News: मराठी बातम्या, Latest News in Marathi, Breaking Marathi News, Marathi News Paper | Maharashtra Times