राज्यातील महिलांच्या सुरक्षेची हमी देण्याची संकल्पना या रॅलीमागे असून त्यासाठी गृहमंत्री देशमुख यांनी पुढाकार घेऊन रॅलीच्या आयोजनाचे निर्देश दिले आहेत. या रॅलीमध्ये महिला पोलिस उपायुक्त, पोलिस निरीक्षक ते पोलिस उपनिरीक्षक, पोलिस कर्मचारी अशा सर्व महिला अधिकारी कर्मचारी, शाळकरी मुली, महिला आणि सामाजिक स्वयंसेवी संस्थांचे प्रतिनिधी सहभागी होणार आहेत.
दरम्यान, महिला दिनानिमित्त विशेष कलाविष्कारांचे आयोजन करण्यात आले असून, सांस्कृतिक कार्य मंत्री अमित देशमुख यांच्या हस्ते सायंकाळी ७.३० वाजता प्रभादेवीच्या पु. ल. देशपांडे महाराष्ट्र कला अकादमीतील रवींद्र नाट्य मंदिरात महिला कला महोत्सवाचे उद्घाटन होणार आहे.
जागतिक महिला दिनाचे औचित्य साधून ७ मार्च ते १२ मार्चदरम्यान (९ आणि १० मार्च वगळून) विविध कार्यक्रम आयोजित करण्यात आले आहेत. रविवारी सायंकाळी साडेसात वाजता होणाऱ्या उद्घाटन समारंभाला सांस्कृतिक राज्यमंत्री राजेंद्र पाटील यड्रावकर, मुंबई जिल्ह्याचे पालकमंत्री अस्लम शेख, मुंबईच्या महापौर किशोरी पेडणेकर, खा. राहुल शेवाळे, आ. सदा सरवणकर, सांस्कृतिक कार्य विभागाचे सचिव संजय मुखर्जी आदी उपस्थित राहणार आहेत.
येत्या १२ मार्च रोजी रात्री आठ वाजता ‘हरवलेल्या पत्त्यांचा बंगला’ या नाटकाने महोत्सवाची सांगता होईल. महिलांसाठी स्वसंरक्षण-प्रात्यक्षिके, सायबर गुन्हे व महिलांची सुरक्षा, त्याचप्रमाणे शास्त्रीय नृत्य, गायन. वादन, महिलांसाठी लावणी कार्यक्रम, कविता, अभिवाचन, बॅले, अभंगवाणी, लोककला, वाद्यवृंद असे अनेक विविधरंगी कार्यक्रम कला महोत्सवाच्या निमित्ताने आयोजित करण्यात आले आहेत. ‘ऐश्वर्या ब्युटी पार्लर’ ‘नली’ या महिलांच्या भावविश्वाशी निगडीत नाटकांचेही आयोजन विशेषत्वाने केले आहे. त्याशिवाय ‘हास्यवती’ या महिलांच्या प्रश्नांशी निगडीत व्यंगचित्रांचे प्रदर्शन आयोजित करण्यात आले आहे. हे सर्व कार्यक्रम विनामूल्य असून या महोत्सवास रसिकांनी आवर्जून उपस्थित राहण्याचे आवाहन प्रकल्प संचालक बिभीषण चवरे यांनी केले आहे.
Marathi News: मराठी बातम्या, Latest News in Marathi, Breaking Marathi News, Marathi News Paper | Maharashtra Times