हायलाइट्स:
- मुलाला फटाके देण्याच्या बहाण्याने सोबत नेऊन केली हत्या
- पुलावरून नदीत दिले ढकलून, सेल्फी घेताना मुलगा पडल्याचा रचला बनाव
- यापूर्वीही आरोपीने मुलाच्या हत्येचा केला होता प्रयत्न
- गुजरातच्या सूरतमध्ये घडली मन सुन्न करणारी घटना
सूरतच्या नानपुरा परिसरात ही धक्कादायक घटना घडली. ३१ वर्षीय आरोपी जाकिरने ३१ ऑक्टोबर रोजी आपल्या मुलाला तापी नदीवरील मक्काई पुलावर नेले होते. त्या पुलावरून त्याने आपल्या मुलाला नदीत ढकलले. मुलगा नदीत पडल्याचे भासवण्यासाठी त्याने मदतीसाठी आरडाओरड केली. माझा मुलगा नदीत पडला, असे तो जोरजोरात बोलू लागता. घटनास्थळी धावून आलेल्या स्थानिकांनी पोलीस आणि अग्निशमन दलाला फोन करून मदत मागितली. पोलिसांनी अग्निशमन दलाच्या मदतीने मुलाचा मृतदेह नदीपात्रातून बाहेर काढला.
पोलिसांनी केलेल्या चौकशीत जाकिरने सांगितले की, तो आपल्या मुलाला फटाके घेऊन देण्यासाठी सोबत घेऊन गेला होता. रस्त्यात तो पुलावरील कठड्यावर बसून सेल्फी घेत होता. त्याचवेळी मुलगा नदीत पडला. पोलिसांनी दुसरीकडे तपास सुरूच ठेवला होता. त्याच्या पत्नीचीही चौकशी केली. आरोपीच्या पत्नीने पोलिसांना सांगितले की, गेल्या पाच वर्षांपासून ते पतीपासून वेगळी राहते. कारण पती चारित्र्यावर संशय घेत होता. त्याने याआधीही आपल्या मुलाला जीवे मारण्याचा प्रयत्न केला होता. त्यावेळी त्याने मुलाला दुसऱ्या मजल्यावरून खाली ढकलून दिले होते, असे पत्नीने पोलिसांना सांगितले.
पोलिसांनी आरोपीला ताब्यात घेऊन खाक्या दाखवला. त्यानंतर आरोपीने गुन्ह्याची कबुली दिली. पोलिसांनी पत्नीच्या तक्रारीवरून गुन्हा दाखल केला आहे. या घटनेचा पुढील तपास सुरू आहे, अशी माहिती पोलिसांनी दिली.
Marathi News: मराठी बातम्या, Latest News in Marathi, Breaking Marathi News, Marathi News Paper | Maharashtra Times