‘महिला म्हणून स्वत:ला कमजोर समजू नका. तुमच्या मनाला जे वाटते, ते आवर्जून करा. तुम्हीच तुमची प्रेरणा आहात. दुसऱ्या कुणीही तुम्हाला प्रेरणा देण्याची गरजच नाही. एकदा स्वत:च्या मनाशी निश्चय केलात, तर तुम्हाला कोणीही थांबवू शकणार नाही, मी ही तेच केले आहे,’ ….
महिला दिनाच्या पूर्वसंध्येला चेन्नईतील ऑफिसर्स ट्रेनिंग अकादमीतून आपले खडतर प्रशिक्षण पूर्ण केलेल्या आणि हुतात्मा पतीचे लष्करी सेवेचे अपुरे स्वप्न पुढे नेणाऱ्या लेफ्टनंट गौरी प्रसाद महाडिक यांचे हे प्रेरणादायी शब्द.
बीकॉम व कायद्याच्या पदवीबरोबरच कंपनी सेक्रेटरीसारखा अवघड अभ्यासक्रम उत्तीर्ण झालेल्या गौरी यांचा २०१५ साली विरारच्या प्रसाद महाडिक यांच्याशी विवाह झाला. मेजर प्रसाद महाडिक हे लष्कराच्या ‘७ बिहार’ या तुकडीत अरुणाचल प्रदेशात चीन सीमेवर तैनात असतानाच त्यांना हौतात्म्य प्राप्त झाले. त्यानंतर गौरी यांनी खचून न जाता पतीचे देशसेवेचे स्वप्न पूर्ण करण्याचा ध्यास घेतला. त्यानंतर त्यांनी ‘संयुक्त संरक्षण सेवे’ची परीक्षा दिली. पहिल्या प्रयत्नात त्या अयशस्वी ठरल्या. पण चिकाटीने त्यांनी पुन्हा परीक्षा दिली आणि वयाच्या ३२व्या वर्षी परीक्षेनंतरच्या मुलाखतीत १६ जणींमधून पहिल्या आल्या. १ एप्रिल २०१९ रोजी चेन्नईत त्यांचे प्रशिक्षण सुरू झाले आणि ७ मार्च २०२० रोजी हे खडतर प्रशिक्षण संपवून त्या लष्करात लेफ्टनंट बनल्या. त्यांचे हे कौतुक पाहायला त्यांचे आई-वडील आवर्जून उपस्थित होते. दीक्षान्त संचलनानंतर ‘मटा’च्या अभिनंदनाचा स्वीकार करत गौरी यांनी आपल्या भावना व्यक्त केल्या.
‘माझ्याबरोबरचे सर्व छात्र २१ ते २५ वयोगटातले होते. त्यांच्यासोबत कसरती करताना शारीरिक क्षमतेचा कस लागायचा. पण सरावाने मला शारीरिक कसरतींमध्येही स्वत:ला सिद्ध करता आले. पाठीवर १५ किलोंचे वजन घेऊन ३० किलोमीटर धावण्याच्या स्पर्धेत मला ब्राँझपदकही मिळाले,’ असेही गौरी यांनी नमूद केले. तीन आठवड्यांच्या सुटीनंतर गौरी लष्करात रूजू होतील.
हा गणवेश ‘आमचा’
‘प्रसाद यांच्या हौतात्मानंतर आपण रडत बसायचे नाही. तर त्यांचे स्वप्न स्वत: जगायचे, असा निश्चय मी केला होता. तो आज काही अंशी साकार झाला. आजचा माझा गणवेश हा आमचा, माझा आणि प्रसाद यांचा, गणवेश आहे. एका बाजूला पतीचे अपूर्ण राहिलेले स्वप्न पूर्ण करण्याच्या दिशेने पडलेले पावलाचा आनंद तर दुसरीकडे पतीला गमावल्याचे दु:ख अशा भावना मनात दाटल्या आहेत. आता त्यांचे देशसेवेचे स्वप्न पूर्ण करण्यासाठी शक्त तितकी मेहनत करेन,’ असे लेफ्टनंट गौरी म्हणाल्या.
Marathi News: मराठी बातम्या, Latest News in Marathi, Breaking Marathi News, Marathi News Paper | Maharashtra Times