हायलाइट्स:
- भाऊ-बहिणीवर काळाचा घाला
- भीषण अपघातात गमावला जीव
- घटनेनं जिल्ह्यात हळहळ
लहान बहीण आणि भाऊ आपल्या मोठ्या बहिणीकडे दुचाकीवरून पंढरपूर तालुक्यातील पळे येथे भाऊबीजेसाठी गेले होते. गावाकडे परत येताना त्यांच्या दुचाकीला अपघात झाला.
याबाबत अधिक माहिती अशी की, अक्षय चौगुले हा त्याच्या लहान बहिणीला सोबत घेऊन दुचाकीवरून भाऊबीजेच्या ओवाळणीसाठी मोठ्या बहिणीकडे गेला होता. पंढरपूर तालुक्यातील पळे येथे मोठ्या बहिणीच्या घरी भाऊबीजेची ओवाळणी झाल्यानंतर अक्षय आणि काजल हे दोघे शनिवारी दुपारी गावाकडे परत येत होते. पंढरपूर ते जत मार्गावर दरीकोणूर गावाजवळ समोरून आलेल्या क्रुझरला दुचाकीची धडक बसून झालेल्या अपघातात अक्षय आणि काजलचा जागीच मृत्यू झाला.
दरीबडची गावापासून अवघ्या एक किलोमीटर अंतरावर झालेल्या अपघातात बहीण-भावाचा दुर्दैवी अंत झाला. या अपघाताची माहिती मिळताच परिसरातील नागरिकांनी घटनास्थळी धाव घेतली. अपघातातील क्रुझर कर्नाटकातील असून ती काही भाविकांसह दाणम्मा देवीच्या दर्शनासाठी निघाली होती. पोलिसांनी क्रुझर चालकाला ताब्यात घेतलं आहे.
दरम्यान, अपघातातील दुचाकीचालक अक्षय चौगुले याचं दोन महिन्यांपूर्वीच लग्न झालं होतं, तर त्याची लहान बहीण काजल ही दहावीच्या वर्गात शिकत होती. भाऊबीजेच्या दिवशीच बहीण-भावाचा दुर्दैवी अपघाती मृत्यू झाल्याने परिसरात हळहळ व्यक्त होत आहे. जत तालुक्यात गेल्या तीन दिवसात वेगवेगळ्या अपघातांमध्ये चौघांचा मृत्यू झाल्याने रस्त्यांवरील प्रवास धोकादायक झाला आहे.
Marathi News: मराठी बातम्या, Latest News in Marathi, Breaking Marathi News, Marathi News Paper | Maharashtra Times