हायलाइट्स:

  • भरधाव कारने चिंचणी-डहाणू मार्गावर पादचाऱ्यांना उडवले
  • पोलीस ठाण्याच्या बाहेर मोठी गर्दी जमल्याने तणावाचे वातावरण
  • सहाय्यक पोलीस निरीक्षकावर गुन्हा दाखल

नरेंद्र पाटील । पालघर

दारूच्या नशेत डहाणू पोलीस ठाण्याच्या सहाय्यक पोलीस निरीक्षकाच्या भरधाव कारने चिंचणी-डहाणू मार्गावर काही पादचाऱ्यांना उडवल्याची घटना शुक्रवारी रात्री घडली. या अपघातात जखमी झालेल्या दोघांची प्रकृती चिंताजनक असल्याने त्यांना उपचारासाठी मुंबईतील नानावटी रुग्णालयात दाखल करण्यात आलं.

डहाणू पोलीस ठाण्याचे सहाय्यक पोलीस निरीक्षक सुहास खरमाटे यांच्या भरधाव खासगी कारने पादचाऱ्यांना उडवले आणि नंतर खरमाटे यांनी सदर कार डहाणू पोलीस स्टेशनच्या आवारात पार्क केली. विशेष म्हणजे या गाडीमध्ये पोलिसांची टोपी असल्याने एकच खळबळ उडाली आणि अशी अपघातग्रस्त गाडी डहाणू पोलीस ठाण्याच्या आवारात आल्याने पोलीस ठाण्याच्या बाहेर मोठी गर्दी जमल्याने तणावाचे वातावरण निर्माण झाले होते.

भाऊबीज झाल्यानंतर बहीण-भावाचा अपघाती मृत्यू; तरुणाचं २ महिन्यांपूर्वीच झालं होतं लग्न!

अपघातग्रस्त कार डहाणूचे सहाय्यक पोलीस निरीक्षक सुहास खरमाटे हे नशेमध्ये चालवत असल्याचं बोललं जात असून सदर कार अपघातानंतर तीन चाकांवरच चालवत आणली गेल्याचं पोलीस उपअधीक्षक यांनी अधिक माहिती देताना सांगितले.

दरम्यान, अपघातानंतर सहाय्यक पोलीस निरीक्षक सुहास खरमाटे यांच्याविरोधात वाणगाव पोलीस ठाण्यात कलम २७९, ३३७, ३३९ अंतर्गत गुन्हा दाखल करण्यात आला असून ते स्वतःच गाडी चालवत असल्याचं पोलिसांनी सांगितलं. तसंच खरमाटे यांची वैद्यकीय तपासणीही करण्यात आली असून पुढील कारवाई करण्यात येणार असल्याची माहिती वाणगाव पोलीस ठाण्याकडून देण्यात आली आहे.

Maharashtra News, Latest Maharashtra News in Marathi, ‎महाराष्ट्र ठळक बातम्या | Maharashtra Times

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here