सध्या महाराष्ट्रात सुरू असलेली आरोप-प्रत्यारोपांची मालिका पाहता, ‘पिक्चर अभी बाकी है…’ या प्रसिद्ध संवादाची आठवण येऊ लागते. राजकीय, वैचारिक विरोधाची परंपरा महाराष्ट्रात जुनी आहे; पण एकमेकांना चिखलात लोळवण्याची ही पद्धत नवी आहे. त्याला ‘कॅच दि आय’ हे तत्त्व लागू होत असल्याने, माध्यमांतही ती जोमाने सुरू आहे. हे सारे असेच चालू राहणे योग्य आहे का, हा महत्त्वाचा प्रश्न आहे.

समर खडस

Samar.Khadas@timesgroup.com

‘ओम शांती ओम’ हा २००७मधील सुपरहीट सिनेमा. यातला ‘पिक्चर अभी बाकी है’ हा संवाद बऱ्यापैकी लोकप्रिय झाला असला, तरी ‘शोले’तील ‘कितने आदमी है’… या संवादाएवढा नाही. या संवादाची सर्वाधिक चर्चा झाली, ती राष्ट्रवादी काँग्रेसचे प्रवक्ते व कॅबिनेट मंत्री यांच्यामुळे. भारतातील वृत्तवाहिन्यांचा व्यवसाय हा ‘कॅच दि आय’ या एकाच तत्त्वावर चालतो. काहीही करून प्रेक्षकांचे लक्ष वेधून घ्या, हेच तत्त्व असल्यामुळे बातमीतली सत्यता, त्याचे परिणाम, त्यातून समाजात जाणारा संदेश, प्रेक्षकांप्रती असलेली बांधिलकी वगैरे गोष्टी गौण होतात. वाहिनी चालविण्यासाठी येणारा प्रचंड खर्च आणि बाजारात असलेली स्पर्धा, यातून अधिकाधिक प्रेक्षक मिळवणे व त्यायोगे स्पर्धेत पुढे राहणे, त्यातून जाहिराती मिळवणे असा उद्देश असतो. वाहिन्यांच्या व्यावसायिक विश्लेषणाचा हा विषय नाही; मात्र गेल्या काही वर्षांमध्ये महाराष्ट्रातील राजकीय पक्षांमधील आरोप-प्रत्यारोपांच्या चिखलफेकीलाच स्वस्त मनोरंजनाचे स्वरूप प्राप्त झाले आहे, त्याचे कारण थोडक्यात समजून घेणे गरजेचे आहे. यातून लोकांचे तात्कालिक मनोरंजन होतही असेल; पण महाराष्ट्रातील राजकीय, सामाजिक वातावरण इतके गढूळ झाले आहे, की मूलभूत मुद्द्यांबाबत लोकांची समज बिघडवण्याचेच काम होते आहे. सांस्कृतिक अधःपतन वगैरे होते की नाही, हा मोठा विषय आहे; मात्र सातत्याने कोणा ना कोणाचे चारित्र्यहनन ऐकण्याचे व्यसन समाजाला लागते आहे. त्यातूनच समाजमाध्यमांवरही गल्लीतल्या उपटसुंभांना दिवसभराच्या धिंगाण्यासाठी जी ऊर्जा लागते, तीही मिळते. त्यामुळेच हा प्रश्न खूप महत्त्वाचा होऊन बसला आहे.

महाराष्ट्रातील राजकीय वादाला खूप मोठी परंपरा आहे. यशवंतराव चव्हाण विरुद्ध एस. एम. जोशी, आचार्य अत्रे यांच्यापासून ते अगदी बाळासाहेब ठाकरे विरुद्ध शरद पवार, जॉर्ज फर्नांडिस येथपर्यंत ती आहे. सध्या महाराष्ट्राच्या राजकारणात जे काही सुरू आहे, ते वाद नाहीत, ती चिखलफेकही नाही, ते समोरच्याला चिखलात लोळवणे या मानसिकतेचे लक्षण आहे.

नवाब मलिक यांनी नार्कोटिक्स कंट्रोल ब्यूरो (एनसीबी) आणि त्याच्या पश्चिम विभागाचे प्रमुख यांच्यावर जी आरोपांची सरबत्ती सुरू केली, त्या आरोपांना आर्यन खान याच्या अटकेच्या पार्श्वभूमीचे कोंदण मिळाले; त्यामुळे साहजिकच यच्चयावत वाहिन्या व त्यांच्या पाठून सगळी वर्तमानपत्रे या वार्तांकनात शिरली. समीर वानखेंडेच्या छोट्याशा कारवाईला गेली काही वर्षे प्रसारमाध्यमे प्रसिद्धी देत होती. तीच प्रसारमाध्यमे आपल्यावरही उलटू शकतील, याची किंचितशीही शंका त्यांना आली नसावी. आर्यन खान याच्याकडे कोणतेही अंमली पदार्थ सापडले नव्हते; तसेच त्याने त्याचे सेवन केल्याचाही कोणताही पुरावा ‘एनसीबी’ने जमवला नव्हता; त्यामुळे सुरुवातीपासूनच या प्रकरणाबाबत समाजमाध्यमांवर दोन्ही बाजूंनी तीव्र प्रतिक्रिया येत होत्या. नेमक्या त्याच वेळी हे प्रकरण हाताळण्यातील काही घोडचुकांची माहिती नवाब मलिक यांनी फोटो व व्हिडिओ क्लिपसह पत्रकार परिषद घेऊन समोर ठेवली आणि हा सिलसिला सुरू झाला. केंद्रीय यंत्रणा असल्यामुळे, त्यांच्या बचावासाठी आपण उतरायलाच हवे असे वाटणारे, गुडघ्याला बाशिंग बांधलेले भारतीय जनता पक्षाचे अनेक नेते वानखेडे आणि ‘एनसीबी’च्या बाजूने उतरले. आरोप-प्रत्यारोपांच्या फैरी झडू लागल्या. वाहिन्यांना झुंजणाऱ्या कोंबड्या मिळाल्यावर, त्यांनी दिवस दिवसभर हा वाद पेटता ठेवला. आजवर आरोपांच्या फैरी झाडण्याचे पेटंट भाजपच्या किरीट सोमय्या यांच्याकडेच असल्याचा समज असलेल्यांची, नवाब मलिक यांनी या प्रकरणात दररोज नवनवे आरोप फोटोंसह करत भलतीच पंचाईत केली. दररोज सकाळी मलिक यांनी ट्वीटवर ‘गुड मॉर्निंग’ केल्या केल्या वाहिन्यांच्या कॅमेऱ्यांची त्यांच्या कुर्ल्यातील घराखाली गर्दी होऊ लागली. वानखेडे यांच्यापासून सुरू झालेली ही आरोपांची मालिका थेट माजी मुख्यमंत्री आणि विरोधी पक्षनेते देवेंद्र फडणवीस व त्यांच्या पत्नी अमृता यांच्यापर्यंत पोहोचल्यावर मात्र भाजप बिचकला. कसलेल्या पैलवानाचा नुकतीच तालीम सुरू केलेल्या नवख्याने पट काढला होता. आता तुम्ही लवंगी फोडलीत, दिवाळीनंतर मी बॉम्ब फोडेन असे प्रति आव्हान लागलीच फडणवीसांनी दिले; त्यामुळे अजूनही पिक्चर संपलेला नाहीच.

हे वातावरण का तयार झाले, याचा खरोखर मोकळ्या मनाने विचार करण्याची गरज आहे. नरेंद्र मोदी यांच्या २०१४मधील विजयाने केवळ भाजपच नव्हे, तर सर्वसामान्य माणसांच्या अपेक्षाही वाढल्या होत्या. अण्णा हजारे यांचे आंदोलन, काँग्रेसमधील निर्नायकी, भ्रष्टाचाराच्या सातत्याने येणाऱ्या बातम्या यामुळे कंटाळलेल्या जनतेला आता नव्या पर्वाची सुरुवात होईल, असे वाटले होते. मोदींनी त्या दृष्टीने पंतप्रधान झाल्या झाल्या प्रयत्न सुरू केले. काय होते ते प्रयत्न?

डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांनी २५ नोव्हेंबर १९४९ रोजी घटना समितीसमोर केलेल्या शेवटच्या भाषणात म्हटले होते, ‘कॅबिनेट फॉर्म ऑफ गव्हर्नमेंट असलेल्या लोकशाहीत मंत्रिमंडळाच्या एकत्रित निर्णय प्रक्रियेला खूप महत्त्व आहे. पंतप्रधान हे मंत्रिमंडळातील इतर मंत्र्यांप्रमाणेच एक सदस्य आहेत.’ ही प्रक्रिया, प्रथा जर एखाद्याने संपवली, तर घटनेची चौकट तशीच ठेवून एखादा हुकूमशाहा देशाचा कारभार चालवू लागेल, असा इशाराही त्यांनी या भाषणात दिला आहे. दिल्लीस्थित राजकीय पत्रकार पी. रमण यांचे ‘ट्रिस्ट विथ स्ट्राँग लीडर पॉप्युलिझम’ नावाचे एक पुस्तक अलीकडेच प्रसिद्ध झाले आहे. मोदी पहिल्यांदा पंतप्रधान झाल्यानंतर त्यांनी ‘कॅबिनेट फॉर्म ऑफ गव्हर्नमेंट’ या घटनाकारांना अभिप्रेत असलेल्या पद्धतीतच कसे बदल केले, याबाबत या पुस्तकात तारखांसह माहिती दिली आहे.

मोदींनी पंतप्रधान झाल्यानंतर मंत्रिमंडळात निर्णय घेणे सुलभ व्हावे, म्हणून विशेषाधिकार असलेल्या मंत्रिमंडळ समित्या रद्द केल्या. ‘पीएमओ’ची स्थापना करून, प्रत्येक मंत्रालयातील सचिवांनी नेहमीच्या कामाव्यतिरिक्त कोणताही निर्णय घेताना थेट ‘पीएमओ’शी संपर्क साधावा, असे फर्मान काढले. एखाद्या निर्णयावर वेळ काढत बसणे त्यांना मान्य नव्हते. तसा वेळ लागल्यास मंत्री व संबंधित खात्याच्या सचिवाने थेट ‘पीएमओ’शी संपर्क साधण्याचा नियम करण्यात आला. समाजमाध्यमांवर कोणत्या गोष्टी सर्वाधिक चर्चेत आहेत, हे ‘पीएमओ’ला कळवणे, फेसबुक व ट्वीटरवर सगळ्या मंत्र्यांनी आपले खाते उघडणे आदी अनेक नियम त्यांनी केले. कारभार वेगाने व्हावा, असा त्यांचा स्तुत्य उद्देश होता; मात्र भारतीय घटनेने अंगीकारलेल्या ‘कॅबिनेट फॉर्म ऑफ गव्हर्नमेंट’ या पद्धतीला कुठे तरी छेद दिला गेला. यातून पंतप्रधान सर्वशक्तिमान होण्यापेक्षा, इतर मंत्री खुजे होत गेले. केंद्रीय यंत्रणा व त्यात कार्यरत सनदी अधिकारी एकाच सत्ताकेंद्रापुढे नतमस्तक होऊ लागले. घटनेने केंद्र व राज्य यांनी कसा कारभार करावा याचे स्पष्ट निर्देश दिले आहेत. कोणत्या गोष्टी केंद्राच्या अखत्यारित, कोणत्या राज्याच्या व कोणत्या दोघांच्या, याच्या याद्या आहेत. आधीच्या काँग्रेसच्या राज्यात ‘पीएमएलए’ (प्रिव्हेन्शन ऑफ मनी लॉन्ड्रिंग अॅक्ट), ‘एनआयए’ (नॅशनल इनव्हेस्टिगेशन एजन्सी) हे केंद्राला विशेष अधिकार देणारे कायदे पी. चिदंबरम यांनी संसदेत मान्य करून घेतले होते. ‘सीबीआय’ हा केंद्र सरकारच्या पिंजऱ्यातला पोपट आहे, असे सर्वोच्च न्यायालयाने काँग्रेसच्या कार्यकाळात म्हटले होते. काँग्रेसच्याच बेजबाबदारपणामुळे व त्या पक्षातील उपजत केंद्र शक्तिशाली बनविण्याच्या सुप्त नेणिवांमुळे, नव्या सरकारच्या पिंजऱ्यात पोपटासोबत, मैना, काकाकुवा अशा विविध पक्षांचा किलबिलाट सुरू झाला.

पश्चिम बंगालमध्ये ‘सीबीआय’चा वापर सुरू झाल्य़ावर, ममता बॅनर्जी यांनी आपल्या स्वभाववैशिष्ट्यानुसार त्यांना बंगाल पोलिसांचा हिसका दाखवला, केरळात हाच हिसका ‘एनआयए’च्या अधिकाऱ्यांना विजयन यांनी दाखवला. महाराष्ट्रात महाविकास आघाडीचे सरकार आल्याने फसवल्याची भावना झालेल्या भाजपच्या नेत्यांनी सरकारवर जोरदार हल्लाबोल चढवला. सातत्याने केंद्राकडे बोट दाखवत, मंत्र्यांना घाबरवले जाऊ लागले. भाजप प्रदेशाध्यक्ष चंद्रकांत पाटील यांनी, ‘तुम्ही जामीनावर बाहेर आहात हे विसरू नका,’ असे छगन भुजबळ यांना एका अधिवेशनात, विधानसभेतच सुनावले. त्याचा उद्देश काय होता, हे वेगळे सांगण्याची गरज नाही. अलीकडेच देगलूर निवडणुकीच्या निमित्ताने त्यांनी नांदेडच्या नेत्याला अटक होणार का, या प्रश्नावर हसत हसत म्हटले, ‘मी काही या यंत्रणांचा अधिकारी नाही; पण माझ्या हसण्याचा अर्थ तुम्ही समजा काय तो……’

किरीट सोमय्या हे भाजपमधील अत्यंत अभ्यासू नेते. ते स्वतः सीए असल्याने हिशेब लावण्यात एकदम पक्के आहेत. त्यांच्या पत्रकार परिषदा म्हणजे वाहिन्यांना पर्वणीच. ते महाविकास आघाडीतील नेत्यांच्या व्यवसायाचे बारिकसारिक तपशीलांसह हिशेब देऊ लागले. आघाडीतील नेत्यांचे, त्यांच्या बहिणींचे, त्यांच्या आईचे कारखाने, संस्था येथे भेटी देऊन नंतर हिशेबाचे कागद फडकावू लागले. त्यांच्या पत्रकार परिषदांनंतर खरोखरीच आयकर, अंमलबजावणी संचालनालय सक्रीय होऊन धाडी घालू लागले; त्यामुळे सोमय्या हे विरोधकांचे अंधःकारमय भवितव्य सांगणारे जणू ज्योतिषीच झाले.

नेमक्या याच वेळी मलिक आखाड्यात उतरले. त्यांच्या जावयाला ‘एनसीबी’ने अंमली पदार्थांच्या व्यापाराच्या आरोपाखाली अटक केल्यानेच मलिक उट्टे काढत आहेत, असा आरोप स्वाभाविकपणे भाजपकडून झाला. फोटो, व्हिडिओंसह मलिकांनी सुरू केलेल्या आरोपांच्या मालिकेत ‘कॅच दि आय’चे जबरदस्त सामर्थ्य वाहिन्यांना दिसू लागले. राखीव जागेतून ‘यूपीएससी’ झालेल्या वानखेंडेंच्या जन्मदाखल्यावरील मुस्लिम धर्म, त्यांच्या पहिल्या विवाहाचा निकाहनामा, विविध प्रकरणांत पंच म्हणून वापरल्या गेलेल्यांची गुन्हेगारी पार्श्वभूमी यांचे धडाधड पुरावे येऊ लागले आणि शेवटी अमृता फडणवीस यांच्या गाण्याचा फायनान्शियल हेड जयदीप राणा, या अंमली पदार्थ प्रकरणात अटक झालेल्या इसमापर्यंत हे प्रकरण आले.

प्रेक्षकांना कंटाळा येत नाही किंवा दुसरे आणखी काही लक्षवेधी घडत नाही, तोपर्यंत हे असेच सुरू राहील किंवा एकमेकांना चिखलात लोळवणे दोन्ही बाजूंनी थांबवू, अशी मांडवलीही होऊ शकेल. प्रश्न आहे, तो या सगळ्यातून जनसामान्यांना या चिखलाच्या लागलेल्या व्यसनाचा. प्रभू राम व छत्रपती शिवाजी महाराज या राज्यकर्त्यांच्या आदर्शानुसार चालण्याचा प्रयत्न करणाऱ्या या जनतेला ‘पिक्चर’ आणखी किती दिवस बाकी ठेवायचा आहे, यावरच सारे काही अवलंबून आहे.

Marathi News: मराठी बातम्या, Latest News in Marathi, Breaking Marathi News, Marathi News Paper | Maharashtra Times

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here