म. टा. विशेष प्रतिनिधी,

मुंबईमध्ये दरवर्षी दिवाळीच्या काळामध्ये प्रदूषणाची चिंता वाढते. मात्र शुक्रवारी झालेल्या पावसामुळे हवेत साचलेली प्रदूषके वाहून गेली आणि त्यानंतर मुंबईच्या हवेची गुणवत्ता सुधारली. शनिवारी मुंबईच्या हवेची गुणवत्ता समाधानकारक श्रेणीमध्ये होती. मात्र त्या आधी नरक चतुर्दशी आणि पाडव्याला हवेची गुणवत्ता थोडी खालावली होती. गुरुवारी मध्यम तर शुक्रवारी हवा वाईट स्वरूपाची होती. सफरच्या पूर्वानुमानानुसार ही पातळी अतिवाईट होण्याची शक्यता होती. मात्र वाऱ्यांमुळे आणि पावसामुळे दिलासा मिळून वायू प्रदूषणामध्ये घट झाली.

शनिवारी मुंबईमध्ये कुलाबा येथे १०.२ मिलिमीटर पावसाची नोंद झाली तर सांताक्रूझ येथे पावसाचा शिडकावा झाला. अरबी समुद्रात कमी दाबाचे क्षेत्र निर्माण झाल्याने मुंबईमध्ये तुरळक पावसाची नोंद झाली. शनिवारी दिवसभर पावसाळी हवेचा प्रभाव मुंबईमध्ये होता. हे क्षेत्र येत्या २४ तासांमध्ये अजून तीव्र होण्याची शक्यता असल्याने त्याचा प्रभाव आणखी दोन दिवस कोकण आणि संलग्न भागावर असेल, अशी माहिती हवामान विभागाचे वरिष्ठ अधिकारी कृष्णानंद होसाळीकर यांनी दिली. दिवाळीमधील या पावसाळी वातावरणामुळे इतरवेळी दिवाळीत साचून राहणारी प्रदूषके यंदा साचून राहिली नाहीत. शुक्रवारी ‘सफर’च्या नोंदीनुसार मुंबईच्या हवेची गुणवत्ता वाईट स्वरूपाची होती. मात्र शुक्रवारी कुलाबा, माझगाव येथे पीएम २.५ मुळे हवेची गुणवत्ता अतिवाईट होती. अंधेरी, वांद्रे कुर्ला संकुल येथे वाईट स्वरूपाची होती. ‘आयक्यू एअर’ या हवेची गुणवत्ता नोंदणाऱ्या यंत्रणेनुसार मुंबईचा जगभरातील प्रदूषित शहरांमध्ये सातवा क्रमांक होता, असे ‘वातावरण फाऊंडेशन’चे भगवान केशभट यांनी पाडव्याच्या दिवशी स्पष्ट केले. शनिवारी भाऊबीजेला प्रदूषणामध्ये घट झाल्याने मुंबईचा १९वा क्रमांक होता. तर पहिल्या दहा शहरांच्या यादीत दिल्लीचे स्थान पहिले आणि कोलकात्याचे स्थान चौथे होते.

आवाजही कमी

गेल्या वर्षीच्या तुलनेत यंदा पुन्हा फटाक्यांमध्ये वाढ झाली असली तरी करोनापूर्व काळापेक्षा फटाक्यांचे प्रमाण यंदाच्या दिवाळीत कमी जाणवले. त्यामुळे ध्वनी आणि या दोन्ही पातळीवर मुंबईकरांना दिलासा मिळाला. ‘आवाज फाऊंडेशन’च्या सुमैरा अब्दुलली यांनी गुरुवारी रात्री केलेल्या मोजणीनुसार आवाजाची सर्वाधिक पातळी १००.४ डेसिबलपर्यंत गेल्याचे सांगितले. सन २०१९ मध्ये ही पातळी ११२ डेसिबलपर्यंत गेली होती. त्यांनी वांद्रे, माहीम, वरळी, दादर, शिवाजी पार्क, बाबुलनाथ, मरिन ड्राइव्ह येथे ध्वनी प्रदूषणाचा अंदाज घेतला. यात शिवाजी पार्क येथे सर्वाधिक प्रदूषण झाल्याचे नोंदले गेले. लक्ष्मीपूजनाच्या दिवशी मुंबईमध्ये सर्वाधिक फटाके फुटले. त्यानंतर दिवाळी पाडव्यालाही पहाटे फारसे फटाके वाजले नाहीत. पाडवा आणि भाऊबीज या दोन्ही दिवशी तुलनेने कमी फटाके वाजले, असे निदर्शनास आले.

Marathi News: मराठी बातम्या, Latest News in Marathi, Breaking Marathi News, Marathi News Paper | Maharashtra Times

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here