हायलाइट्स:

  • गोपीचंद पडळकर आणि शिवसेना, राष्ट्रवादी समर्थकांमध्ये राडा
  • पडळकरांनी गाडी अंगावर घातल्याचा शिवसेना कार्यकर्त्याचा आरोप
  • आमदार पडळकर यांच्या गाडीवर दगडफेक

सांगली : जिल्हा बँकेच्या मतदानासाठी ठराव करण्याच्या वादातून भाजप आमदार गोपीचंद पडळकर आणि शिवसेना, राष्ट्रवादीच्या कार्यकर्त्यांमध्ये रविवारी सायंकाळी जोरदार राडा झाला. आमदार पडळकर यांनी गाडी अंगावर घातल्याचा आरोप शिवसेनेचे कार्यकर्ते राजू जानकर यांनी केला आहे, तर शिवसेना आणि राष्ट्रवादी काँग्रेसच्या संतप्त कार्यकर्त्यांनी गोपीचंद पडळकर यांच्या गाडीवर जोरदार दगडफेक केली. या घटनेनं आटपाडीत प्रचंड तणाव निर्माण झाला असून पोलीस बंदोबस्त वाढवण्यात आला आहे.

सांगली जिल्हा बँकेच्या निवडणुकीवरून सुरू झालेला शाब्दिक वाद आता मारामारीपर्यंत पोहोचला आहे. आटपाडीतील शिवसेनेचे कार्यकर्ते राजू जानकर यांच्या मेहुण्याने जिल्हा बँक निवडणुकीत शिवसेनेच्या उमेदवाराला मदत करण्याचा निर्णय घेतला आहे. यावरून आमदार गोपीचंद पडळकर आणि ब्रह्मानंद पडळकर यांनी फोन करून राजू जानकर यांना दमबाजी केली, असा आरोप आहे.

अहमदनगर रुग्णालय आग : मृतांच्या पोस्टमार्टम रिपोर्टमधून महत्त्वाची माहिती समोर

गोपीचंद पडळकर यांच्यावर गंभीर आरोप

‘तुला बघून घेतो, असं म्हणत मला पडळकर यांनी आटपाडी पोलीस ठाण्याच्या चौकात बोलावले. रविवारी सायंकाळी साडेपाचच्या सुमारास मी शिवसेनेच्या कार्यकर्त्यांसह आटपाडी पोलीस ठाण्यासमोर चौकात पोहोचलो. थोड्याच वेळात आमदार पडळकर हे कार्यकर्त्यांसह पोलीस ठाण्यासमोर पोहोचले. आमदार पडळकर यांनी भरधाव गाडी अंगावर घालून जिवे मारण्याचा प्रयत्न केला,’ असा आरोप जानकर यांनी केला आहे.

या घटनेत जानकर यांचा पाय मोडला असून, त्यांच्यावर खासगी रुग्णालयात उपचार सुरू आहेत.

शिवसेना आणि राष्ट्रवादीच्या संतप्त कार्यकर्त्यांनी दगडफेक करत आमदार गोपीचंद पडळकर यांची गाडी अडवण्याचा प्रयत्न केला. आमदार पडळकर आणि त्यांचे भाऊ ब्रह्मानंद पडळकर हे भरधाव वेगाने निघून गेले. यावेळी शिवसेना आणि राष्ट्रवादीच्या संतप्त कार्यकर्त्यांनी पडळकर समर्थकांच्या तीन गाड्यांची तोडफोड केली. पोलिसांनी तातडीने धाव घेऊन दोन्ही गटाच्या समर्थकांना अडवण्याचा प्रयत्न केला.

दरम्यान, आटपाडीतील राजकीय संघर्ष हिंसक वळणावर पोहचल्याने पोलिसांनी शहरात बंदोबस्त वाढवला आहे. जखमी राजू जानकर यांच्याकडून फिर्याद देण्याचे काम सुरू असून आमदार पडळकर यांनीच अंगावर गाडी घातल्याचा जबाब त्यांनी नोंदवला आहे.

Maharashtra News, Latest Maharashtra News in Marathi, ‎महाराष्ट्र ठळक बातम्या | Maharashtra Times

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here