हायलाइट्स:

  • ‘तालुका पातळीवरही मोठ्या प्रमाणात ड्रग्ज सेवनाचे प्रमाण’
  • ‘नेक्सस मोडून काढण्याचा प्रयत्न केला जाणार’
  • गृहमंत्र्यांचं पुण्यात बोलताना वक्तव्य

पुणे : ‘शहरासह तालुका पातळीवरही मोठ्या प्रमाणात ड्रग्ज सेवनाचे प्रमाण वाढलं असून, ही वस्तुस्थिती आपण मान्य केली पाहिजे,’ अशी कबुली राज्याचे गृहमंत्री दिलीप वळसे पाटील (Dilip Walse Patil) यांनी रविवारी दिली. या संदर्भात गृह विभागाकडून कार्यक्रमाची आखणी केली जात असून, त्या माध्यमातून हे ‘नेक्सस’ मोडून काढण्याचा प्रयत्न केला जाईल, असंही वळसे पाटील यांनी म्हटलं आहे.

राज्य महिला आयोगाच्या अध्यक्षपदी रुपाली चाकणकर यांची निवड झाल्याबद्दल गृहमंत्र्यांच्या हस्ते त्यांचा सत्कार करण्यात आला. यावेळी ते बोलत होते.

अहमदनगरमधील दुर्घटनेनंतर आरोग्यमंत्र्यांनी दिले महत्त्वाचे आदेश

महिलांच्या सुरक्षिततेसाठी गृह मंत्रालयाकडून करण्यात येणाऱ्या उपाययोजनांची माहिती गृहमंत्र्यांनी दिली. ‘महिला व बालकांवर होणाऱ्या बलात्काराच्या व अत्याचाराच्या घटनांमध्ये ९५ टक्के घटना परिचितांकडून होतात. ते रोखण्यासाठी पालकांनी, शाळांनी पुढाकार घेऊन मुला-मुलींना जागृत केले पाहिजं,’ असंही दिलीप वळसे पाटील यांनी म्हटलं आहे.

तत्पूर्वी, सत्काराला उत्तर देताना, महिला आयोगाचे संकेतस्थळ लवकरच कार्यान्वित केले जाईल, तसंच पीडित महिलांसाठी आधार असलेल्या ‘वन स्टॉप सेंटर’ योजनेला चालना दिली जाईल, असं रुपाली चाकणकर यांनी सांगितलं आहे. ‘महिला आयोग, गृह खाते आणि स्वयंसेवी संस्थांनी एकत्रित काम केल्यास राज्य महिला आयोग हे राज्यातील महिलांना आपले माहेर वाटेल,’ असा विश्वासही त्यांनी व्यक्त केला.

गोपीचंद पडळकर यांनी अंगावर गाडी घातली; शिवसेना कार्यकर्त्याचा आरोप

हिवाळी अधिवेशनात शक्ती विधेयक मंजूर करणार

महिला व बालकांवरील अत्याचाराच्या विरोधात कठोर कारवाईसाठी प्रस्तावित शक्ती विधेयकाचे अंतिम प्रारुप विधानसभेची संयुक्त छाननी समिती (जॉइंट सिलेक्ट कमिटी) तयार करत असून, येत्या हिवाळी अधिवेशनात ते मंजूर केले जाईल, अशी घोषणाही गृहमंत्री दिलीप वळसे पाटील यांनी केली. महिलांच्या सुरक्षिततेसाठी ११२ हा क्रमांक कार्यान्वित करण्यात येत असून, मुख्यमंत्री व उपमुख्यमंत्र्यांच्या हस्ते लवकरच त्याचे उद्घाटन होईल. या हेल्पलाइनवर फोन केल्यावर तातडीने पोलिसांची मदत उपलब्ध होईल, असंही त्यांनी म्हटलं आहे.

पोर्नोग्राफीवर बंदी आणावी

खासदार वंदना चव्हाण यांनी वाढते महिला अत्याचार रोखण्यासाठी पोर्नोग्राफीवर बंदी आणण्यासाठी गृह मंत्रालय व महिला आयोगाने पुढाकार घ्यावा, अशी मागणी केली. महिलांच्या सुरक्षिततेच्या दृष्टीने शहराचे सेफ्टी ऑडिट व्हावे, महिलांविषयक कायद्यांबाबत जनजागृती करावी, वन स्टॉप सेंटरला चालना द्यावी, अशा मागण्याही त्यांनी केल्या.

दरम्यान, यावेळी मावळचे खासदार श्रीरंग बारणे, राष्ट्रवादीचे प्रवक्ते अंकुश काकडे, आमदार सुनील टिंगरे, राष्ट्रवादीचे पुणे शहराध्यक्ष प्रशांत जगताप, पिंपरी-चिंचवड शहराध्यक्ष संजोग वाघेरे, शिवसेनेचे संपर्कप्रमुख सचिन अहीर, काँग्रेसचे शहराध्यक्ष रमेश बागवे, महापालिकेच्या विरोधी पक्षनेत्या दिपाली धुमाळ, माजी नगरसेविका रुक्मिणी चाकणकर आदी उपस्थित होते.

Marathi News: मराठी बातम्या, Latest News in Marathi, Breaking Marathi News, Marathi News Paper | Maharashtra Times

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here