हायलाइट्स:
- ‘आंदोलनात ६०० शेतकऱ्यांचा मृत्यू पण सरकारनं संवेदनाही व्यक्त केल्या नाहीत’
- सत्यपाल मलिकांचा केंद्रातील मोदी सरकारवर निशाणा
- इंदिरा गांधींचं उदाहरण देत मलिकांचा पंतप्रधान मोदींना सल्ला
जयपूरमध्ये ‘ग्लोबल जाट समिट’ला संबोधित करताना सत्यपाल मलिक बोलत होते. शेतकऱ्यांच्या मुद्यावर दिल्लीतील नेत्यांना आपल्या निशाण्यावर घेण्यासाठी आपलं पद गमवावं लागलं तरी बेहत्तर, असं मलिक यांनी यावेळी म्हटलं. ‘राज्यपालांना हटवलं जाऊ शकत नाही, परंतु माझे काही शुभचिंतक आहेत जे याच शोधात असतात की यांनी काहीतरी बोलावं आणि हटवण्याची संधी मिळावी’ असं मलिक यांनी म्हटलं. यानंतर, भाजपमधले हे नेते कोण? अशी चर्चाही राजकीय वर्तुळात सुरू झालीय.
‘दिल्लीतल्या दोन – तीन नेत्यांनी मला राज्यपाल बनवलं. ज्या दिवशी ते म्हणतील की माझ्यामुळे समस्या निर्माण झाल्या आणि मला पद सोडण्यासाठी सांगितलं जाईल तेव्हा राजीनामा सोपवायला मी एक मिनिटही घेणार नाही’, असंही वक्तव्य मलिक यांनी केलंय.
‘तब्बल ६०० मृत्यू झालेलं हे पहिलंच आंदोलन’
‘मी जन्मापासून राज्यपाल नाही. माझ्याजवळ जे काही आहे ते गमावण्यासाठी मी नेहमीच तयार असतो. परंतु, मी जबाबदारी नाकारू शकत नाही. मी पद सोडू शकतो परंतु, शेतकऱ्यांना पीडित अवस्थेत आणि पराभव होताना पाहू शकत नाही. देशात याअगोदर असं एकही आंदोलन झालेलं नाही ज्यात तब्बल ६०० मृत्यूंची नोंद झाली असावी’, असं म्हणत त्यांनी केंद्रानं लागू केलेल्या कृषी कायद्यांविरुद्ध दिल्लीच्या सीमांवर जवळपास वर्षभरापासून सुरू असलेल्या शेतकरी आंदोलनाचा उल्लेख केला. ‘एखादा कुत्रा मेला तर दिल्लीच्या नेत्यांचा शोक संदेश येतो. परंतु, ६०० शेतकऱ्यांच्या शोक संदेशाचा प्रस्ताव लोकसभेत संमत झाला नाही’, असं म्हणत त्यांनी मोदी सरकारला आणखीन अडचणीत आणलंय.
इंदिरा गांधींच्या हत्येचा उल्लेख
यावेळी बोलताना १९८४ मध्ये तत्कालीन पंतप्रधान इंदिरा गांधी यांची त्यांच्याच शीख अंगरक्षकांकडून झालेल्या हत्येचा उल्लेखही मलिक यांनी आपल्या भाषणात केला. ‘आपण पंतप्रधान मोदींना शीख आणि जाट समुदायाशी शत्रुत्व न घेण्याचा सल्ला दिला होता’, असंही त्यांनी यावेळी म्हटलं. न्यूनतम समर्थन मूल्याची हमी देऊन या मुद्यावर तोडगा काढला जाऊ शकतो, या आपल्या विधानावर त्यांनी पुन्हा एकदा जोर दिलाय.
नव्या संसद भवनावर वायफळ खर्च
यावेळी, पंतप्रधान नरेंद्र मोदी आणि मोदी सरकारचा महत्त्वकांक्षी प्रकल्प असलेल्या ‘सेंट्रल विस्टा पुनर्विकास योजने’वरही सत्यपाल मलिक यांनी टीका केलीय. ‘एका नव्या संसद भवनाऐवजी एखादं आंतरराष्ट्रीय महाविद्यालय उभारणं अधिक योग्य ठरेल’, असं म्हणत सेंट्रल विस्टावर वायफळ उधळपट्टी केली जात असल्याचं मत सत्यपाल मलिक यांनी व्यक्त केलंय.
सत्यपाल मलिक यांना पंतप्रधान मोदींच्या कार्यकाळातच जम्मू – काश्मीर, गोवा आणि मेघालयच्या राज्यपालपदाची संधी मिळालीय.
Marathi News: मराठी बातम्या, Latest News in Marathi, Breaking Marathi News, Marathi News Paper | Maharashtra Times