हायलाइट्स:
- ‘पद्म’ विजेत्या ११९ मान्यवरांत २९ महिलांचा समावेश
- १६ जणांना मरणोत्तर ‘पद्म पुरस्कार’
- जपानचे माजी पंतप्रधान शिंजो आबे यांचा ‘पद्मविभूषण’ पुरस्कारानं सन्मान
देशातील दुसऱ्या क्रमांकाचा सर्वोच्च नागरिक पुरस्कार ‘पद्म विभूषण’ प्राप्त मान्यवरांत दीर्घकाळापर्यंत जपानचं पंतप्रधान पद भूषणवणारे शिंजो आबे यांचाही समावेश आहे.
पार्श्वगायक एस पी बालासुब्रमण्यम (मरणोत्त) यांना पद्म विभूषण तर आसामचे माजी मुख्यमंत्री तरुण गोगोई (मरणोत्तर), माजी केंद्रीय मंत्री रामविलास पासवान (मरणोत्तर), आणि माजी लोकसभा सभापती सुमित्रा महाजन यांना ‘पद्वभूषण’ पुरस्कारानं सन्मानित करण्यात आलं.
‘पद्म विभूषण’ पुरस्कारानं सन्मान
शिंजो आबे: जपानचे माजी पंतप्रधान शिंजो आबे यांच्या कार्यकाळात भारत-जपान संबंधांत बरीच प्रगती झाली. सार्वजनिक सेवेसाठी त्यांना पद्मविभूषण पुरस्कारानं सन्मानित करण्यात आलंय.
एसपी बालसुब्रमण्यम (मरणोत्तर): गायक एस पी बालासुब्रमण्यम यांना कला क्षेत्रातील योगदानासाठी पद्मविभूषण पुरस्कारानं सन्मानित करण्यात आलं. बालासुब्रमण्यम यांची तेलुगू, तमिळ, कन्नड, हिंदी आणि मल्याळम भाषांमध्ये हजारो गाण्यांनी श्रोत्यांना मंत्रमुग्ध केलंय.
सुदर्शन साहू: ओडिशाचे प्रसिद्ध शिल्पकार सुदर्शन साहू यांना त्यांच्या कला क्षेत्रातील योगदानाबद्दल पद्मविभूषण पुरस्कारानं सन्मानित करण्यात आलं. त्यांच्या कलाकृतींची जगभरात चर्चा आहे.
नरिंदर सिंग कपानी: केंद्रीय गृह मंत्रालयानं दिलेल्या माहितीनुसार, प्रख्यात भारतीय – अमेरिकन भौतिकशास्त्रज्ञ नरिंदर सिंग कपानी यांना फायबर ऑप्टिक्स क्षेत्रातील त्यांच्या कार्यासाठी मरणोत्तर पद्मविभूषण पुरस्कारानं सन्मानित करण्यात आलंय.
याचसोबत, कर्नाटकचे प्रख्यात हृदयरोगतज्ज्ञ बेल्ले मोनाप्पा हेगडे, भारतीय इस्लामिक विद्वान आणि कार्यकर्ते मौलाना वहिदुद्दीन खान, पुरातत्वशास्त्रज्ञ बीबी लाल यांनाही पद्मविभूषण पुरस्कारानं सन्मानित करण्यात आलं.
माजी परराष्ट्र मंत्री सुषमा स्वराज यांना मरणोत्तर पद्मविभूषण पुरस्कार प्रदान करण्यात आला. त्यांची मुलगी बान्सुरी स्वराज यांनी आपल्या आईच्या वतीनं हा पुरस्कार स्वीकारला
‘पद्मभूषण’ पुरस्कारानं सन्मान
याशिवाय एकूण १० जणांना ‘पद्मभूषण’ पुरस्कार प्रदान करण्यात आला आहे. यामध्ये आसामचे माजी मुख्यमंत्री तरुण गोगोई (मरणोत्तर), माजी केंद्रीय मंत्री रामविलास पासवान (मरणोत्तर) आणि लोकसभेच्या माजी अध्यक्षा सुमित्रा महाजन यांच्याशिवाय गुजरातचे माजी मुख्यमंत्री केशुभाई पटेल (मरणोत्तर), भारतीय इस्लामिक विद्वान कल्बे सादिक (मरणोत्तर), पंतप्रधानांचे माजी सचिव नृपेंद्र मिश्रा, समाजसेवक तरलोचन सिंग, शास्त्रीय गायक के एस चित्रा, चंद्रशेखर कंबारा, रजनीकांत देविदास श्रॉफ यांचा समावेश आहे.
‘पद्मश्री’ पुरस्कारानं सन्मान
तसंच माजी राज्यपाल मृदुला सिन्हा (मरणोत्तर) आणि माजी केंद्रीय मंत्री बिजॉय चक्रवर्ती यांना ‘पद्मश्री’ पुरस्कारानं सन्मानित करण्यात आलंय. तसंच ब्रिटिश चित्रपट दिग्दर्शक पीटर ब्रूक, फादर वलिस (मरणोत्तर), प्राध्यापक चमन लाल सप्रू (मरणोत्तर) यांच्यासह एकूण १०२ व्यक्तींना पद्मश्री पुरस्कारानं सन्मानित करण्यात आल.
कलाकाराचा अभिमान
त्याचबरोबर कंगना राणौत, सरिता जोशी, गायक अदनान सामी यासंहीत अनेक कलाकारांना ‘पद्मश्री’ पुरस्कारानं सन्मानित करण्यात आलं.
विशेष बाब म्हणजे ‘पद्म’ पुरस्कार विजेत्यांमध्ये २९ महिलांचा तर एका ट्रान्सजेंडर व्यक्तीचा समावेश आहे. तसंच १० व्यक्ती अनिवासी भारतीय (एनआरआय), भारतीय वंशाच्या व्यक्ती (PIO) आणि भारताचे परदेशी नागरिक आहेत.
Marathi News: मराठी बातम्या, Latest News in Marathi, Breaking Marathi News, Marathi News Paper | Maharashtra Times