हायलाइट्स:

  • साताऱ्यात राजकीय घडामोडींना वेग
  • उदयनराजे भोसले आणि रामराजे नाईक निंबाळकर यांची भेट
  • दोन्ही नेत्यांमध्ये सुमारे एक ते दीड तास बंद दाराआड चर्चा

सातारा : जिल्हा मध्यवर्ती बँकेच्या निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर साताऱ्यात राजकीय घडामोडींना वेग आला आहे. भाजपचे राज्यसभा खासदार उदयनराजे भोसले यांनी आज राष्ट्रवादीचे नेते आणि विधानपरिषदेचे सभापती रामराजे नाईक निंबाळकर यांची भेट घेतली आहे. या दोन्ही नेत्यांमध्ये सुमारे एक ते दीड तास बंद दाराआड चर्चा झाल्याने जिल्ह्यातील राजकीय वातावरण ढवळून निघालं आहे.

उदयनराजे आणि रामराजेंच्या या भेटीत जिल्हा मध्यवर्ती बँकेची आगामी निवडणूक आणि संचालकपदाबाबत चर्चा झाल्याची माहिती आहे. खासदार उदयनराजे आणि रामराजे यांच्यातील राजकीय संघर्ष सर्वश्रुत आहे. अशातच उदयनराजेंनी रामराजेंची भेट घेतल्याने राजकीय वर्तुळात चर्चांना उधाण आलं‌ असून उदयनराजेंची वर्णी जिल्हा बँकेच्या संचालक पदावर लागणार का, याकडे सगळ्यांचं लक्ष लागलं आहे.

PM मोदी म्हणाले, ‘विठ्ठलाला साष्टांग दंडवत…’; मागितले तीन आशीर्वाद

दरम्यान, जिल्हापरिषदेचे माजी अध्यक्ष संजीवराजे नाईक निंबाळकर आणि उदयनराजे यांच्यामध्येही अर्धा तास बंद दाराआड चर्चा झाली.

जिल्हा बँक निवडणुकीत उदयनराजे विरुद्ध शिवेंद्रराजे संघर्ष?

सातारा जिल्हा मध्यवर्ती बँकेच्या निवडणुकीत खासदार उदयनराजे भोसले आणि आमदार शिवेंद्रसिंहराजे भोसले या दोन्ही नेत्यांमध्ये सध्या संघर्ष सुरू आहे. सत्ताधारी राष्ट्रवादी काँग्रेसप्रणीत सर्वपक्षीय पॅनेलमध्ये आपला समावेश केला नसल्याबद्दल खासदार उदयनराजे भोसले यांनी काही दिवसांपूर्वीच जाब विचारला होता. मात्र, याबाबत मला विचारण्यापेक्षा हा प्रश्न शरद पवार यांना विचारा, असं उत्तर शिवेंद्रसिंहराजेंनी उदयनराजेंना दिलं होतं. त्यामुळे आगामी काळात या निवडणुकीबाबत नक्की काय घडामोडी घडतात, हे पाहणं औत्सुक्याचं ठरणार आहे.

Maharashtra News, Latest Maharashtra News in Marathi, ‎महाराष्ट्र ठळक बातम्या | Maharashtra Times

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here