हायलाइट्स:
- भास्कर जाधव यांनी घेतली राष्ट्रवादीचे माजी आमदार संजय कदम यांची भेट
- रत्नागिरी जिल्ह्यात राजकीय चर्चांना उधाण
- महाविकास आघाडीत रस्सीखेच?
आमदार भास्कर जाधव आज खेड येथे रुग्णवाहिका लोकार्पण कार्यक्रमासाठी आले होते. यावेळी त्यांनी ही भेट घेतली आहे. या दोघांमध्ये सुमारे अर्धा तास वेगवेगळ्या विषयांवर चर्चा झाली. यावेळी संजय कदम यांचे मोठे बंधू सतीश कदम यांच्यासह स. तु. कदम, प्रकाश मोरे आदी उपस्थित होते.
भास्कर जाधव यांच्या या अनपेक्षित भेटीमुळे राजकीय वर्तुळात खळबळ उडाली असून उलट-सुलट चर्चा सुरू झाल्या आहेत. आमदार जाधव राष्ट्रवादीमध्ये असताना माजी आमदार संजय कदम हे त्यांचे जवळचे सहकारी म्हणून ओळखले जात. अलीकडेच राष्ट्रवादीचे नेते आणि खासदार सुनील तटकरे यांनी शिवसेनेत गेले अनेक दिवस नाराज असलेल्या दोन कुणबी समाजातील नेत्यांना राष्ट्रवादीत प्रवेश देऊन महाविकास आघाडीत असलेल्या शिवसेनेला थेट आव्हान दिले. यामध्ये एका कुणबी नेत्याचा विधानपरिषदेवर घेण्यासाठी विचार करू, असा शब्द देण्यात आला आहे. त्यामुळे राष्ट्रवादीतील एक स्थानिक नेता नाराज असल्याची कुजबुज गेले काही दिवस सुरू आहे.
दरम्यान, सुनील तटकरे व आमदार भास्कर जाधव यांच्यातील शीतयुद्ध संपूर्ण जिल्ह्याला ज्ञात आहे. या सगळ्या पार्श्वभूमीवर राष्ट्रवादीचे माजी आमदार संजय कदम व शिवसेनेचे विद्यमान आमदार भास्कर जाधव यांच्या भेटीला कमालीचं महत्व प्राप्त झालं आहे. त्यामुळे रत्नागिरी जिल्ह्यात आगामी काळात नेमक्या काय घडामोडी घडतात, हे पाहणं महत्त्वाचं ठरणार आहे.
Maharashtra News, Latest Maharashtra News in Marathi, महाराष्ट्र ठळक बातम्या | Maharashtra Times