हायलाइट्स:

  • कोल्हापूरमध्ये तरुणाची आत्महत्या
  • व्हॉट्सअ‍ॅपवर शेअर केली होती सुसाईड नोट
  • घटनेनं जिल्ह्यात खळबळ

कोल्हापूर : एका कुख्यात टोळीकडून होणाऱ्या खंडणीच्या तगाद्याला कंटाळून इचलकरंजी येथील तरूणाने आत्महत्या केल्याची घटना समोर आली आहे. आत्महत्या करण्यापूर्वी त्याने व्हॉट्सअ‍ॅप स्टेटसला याबाबतची माहिती ठेवली होती. हे स्टेटस वाचून त्याला वाचवण्यासाठी त्याचे मित्र घराकडे धावले, पण तोपर्यंत त्याने आपला जीवन प्रवास संपवला होता. या घटनेनं इचलकरंजी परिसरात खळबळ उडाली आहे.

इचलकरंजी येथील जवाहरनगर परिसरात आदित्य बळवंत महाद्वार हा २४ वर्षीय तरूण आपल्या आई-वडिलांसह राहत होता. रविवारी रात्री त्याने आई वडिलांना काही तरी कारण सांगून घराबाहेर पाठवले. आई नातेवाईकांकडे आणि वडील बाहेर फिरायला गेल्यानंतर त्याने घरात गळफास लावून घेत आत्महत्या केली. त्यापूर्वी त्याने एक चिठ्ठी लिहिली. त्यामध्ये इचलकरंजी येथील जर्मनी टोळीच्या त्रासाला कंटाळून आपण आत्महत्या करत असल्याचं नमूद केलं होतं. टोळीतील चौघांची नावेही यामध्ये लिहिण्यात आली आहेत.

भीषण अपघात : एका तरुणाचा जागीच मृत्यू; दुसऱ्याने रुग्णालयात सोडले प्राण

चिठ्ठी लिहिल्यानंतर त्याचा फोटो काढून ते त्याने मोबाइलवरील स्टेटसला ठेवले. या टोळीने यापूर्वी २५ हजार रुपये व सोन्याची अंगठी घेतली आहे. पुन्हा पैशासाठी त्यांनी तगादा लावला असून पैसे न दिल्यास आई वडिलांना ठार मारण्याची धमकी दिली आहे, असं या चिठ्ठीत त्याने नमूद करून या टोळीच्या तगाद्याला कंटाळून आपण आत्महत्या करत असल्याचं लिहिलं. स्टेटसला ठेवलेली ही चिठ्ठी त्याच्या काही मित्रांनी पाहिली. ते तातडीने त्याच्या घराकडे धावले. पण तत्पूर्वीच त्याने आत्महत्या केल्याचं उघडकीस आलं. याबाबत शिवाजीनगर पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल झाला आहे.

दरम्यान, महाद्वार याने चिठ्ठीत नमूद केलेल्या जर्मनी टोळीतील अनेकांवर विविध गुन्हे दाखल आहेत. त्याने टोळीतील काहींची नावेच चिठ्ठीत लिहिली आहेत. या घटनेमुळे जिल्ह्यात खळबळ उडाली असून पोलिसांकडून पुढील तपास करण्यात येत आहे.

Marathi News: मराठी बातम्या, Latest News in Marathi, Breaking Marathi News, Marathi News Paper | Maharashtra Times

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here