सातारा जिल्हा मध्यवर्ती बँकेच्या निवडणुकीच्या अनुषंगाने छत्रपती उदयनराजे भोसले यांनी आज कराडमधील राजकीय नेत्यांची भेट घेतली. माजी मुख्यमंत्री पृथ्वीराज चव्हाण आणि उदयसिंह उंडाळकर यांच्याशी कमराबंद बैठकीनंतर पत्रकारांनी उदयनराजे भोसले यांना बोलता करण्याचा प्रयत्न केला. मात्र, त्यांनी पत्रकारांच्या प्रश्नांना त्यांच्या स्टॉईलने उत्तरे दिली.
पत्रकारांनी प्रश्न विचारले असता ‘अजून गाठी भेटी संपायच्या आहेत. सर्व मतदार आहेत. कुठे जायचे ते मी ठरवतो. सर्व समावेशक पॅनेलमध्ये जायचे का नाही ठरवायचे चालले नाही. मी लोकांच्या सोबत आहे. मी माझ्या बंधूना गेली अनेक दिवस झाले सांगतोय मी तुमच्यासोबत आहे. पण त्यांच्या लक्षात येत नाही. मतदारांनी सांगितले तर फॉर्म विड्रॉ करेन बाकी कोणाच्या सांगण्याने नाही. मला कधी जिल्ह्यातल्या राजकारणात ढवळाढवळ करताना पाहिले का ? पण माझा विषय आला की सगळे ढवळा ढवळ करतात.’ असं उदयनराजे म्हणाले आहेत.
जिल्हा बँक निवडणुकीत उदयनराजे विरुद्ध शिवेंद्रराजे संघर्ष?
सातारा जिल्हा मध्यवर्ती बँकेच्या निवडणुकीत खासदार उदयनराजे भोसले आणि आमदार शिवेंद्रसिंहराजे भोसले या दोन्ही नेत्यांमध्ये सध्या संघर्ष सुरू आहे. सत्ताधारी राष्ट्रवादी काँग्रेसप्रणीत सर्वपक्षीय पॅनेलमध्ये आपला समावेश केला नसल्याबद्दल खासदार उदयनराजे भोसले यांनी काही दिवसांपूर्वीच जाब विचारला होता. मात्र, याबाबत मला विचारण्यापेक्षा हा प्रश्न शरद पवार यांना विचारा, असं उत्तर शिवेंद्रसिंहराजेंनी उदयनराजेंना दिलं होतं. त्यामुळे आगामी काळात या निवडणुकीबाबत नक्की काय घडामोडी घडतात, हे पाहणं औत्सुक्याचं ठरणार आहे.
Maharashtra News, Latest Maharashtra News in Marathi, महाराष्ट्र ठळक बातम्या | Maharashtra Times