हायलाइट्स:
- बेवारस मृतदेहांचे ‘मसीहा’ म्हणून शरीफ चाचांची ओळख
- जात-धर्म भेदभाव बाजुला सारून जवळपास २५ हजारांहून अधिक मृतदेहांवर अंत्यसंस्कार
- ८० वर्षांचे शरीफ चाचा इतरांसाठी प्रेरणास्थान
बेवारस मृतदेहांचे ‘मसीहा’ म्हणून शरीफ चाचांची ओळख आहे. गेल्या २५ वर्षांत जात-धर्म भेदभाव बाजुला सारून त्यांनी जवळपास २५ हजारांहून अधिक मृतदेहांवर अंत्यसंस्कार केले आहेत.
शरीफ चाचांची ‘पद्मश्री’ पुरस्कारासाठी निवड झाल्याचं पत्र त्यांना २०२० साली मिळालं होतं. परंतु, करोना संक्रमणाच्या पार्श्वभूमीवर हा पुरस्कार त्यांनी काल (सोमवारी) स्वीकारला.
मुलाच्या मृत्यूनंतर घेतला निर्णय
१९९३ साली शरीफ चाचांच्या तरुण मुलाचा – मोहम्मद रईस याचा एका अपघातात मृत्यू झाला होता. अपघातानंतर लगेचच कुटुंबीयांची माहिती समजू न शकल्यानं रईसच्या मृतदेहावर बेवारस म्हणून अंत्यसंस्कार पार पडले होते. या घटनेनं शरीफ चाचा पुरते कोसळले. परंतु, यानंतर त्यांनी स्वत:ला मानवसेवेत झोकून दिलं. अयोध्येत यापुढे कुणाच्याही मृतदेहावर बेवारस म्हणून अंत्यसंस्कार होणार नाहीत मग तो कोणत्याही जाती-धर्माचा असेना, असा पण त्यांनी केला. यानंतर प्रत्येक बेवारस मृतदेहावर त्यांच्या धर्माच्या परंपरेनुसार शरीफ चाचांनी अंत्यसंस्कार केले आहेत. यामुळेच आज ते इतरांसाठी प्रेरणास्थान बनलेत.
शरीफ चाचा आज ८० वर्षांचे आहेत. मोहल्ला खिडकी अली बेग भागात राहणारे शरीफ चाचा सायकल दुरुस्तीचं काम करतात. त्यांच्या एकूण चार मुलांपैंकी दोघांचा मृत्यू झाला आहे. आज शरीफ चाचांची आर्थिक स्थितीही फार चांगली नाही. कुटुंबीयांवर कर्ज फेडण्याचीही जबाबदारी आहे. वयोमानानुसार त्यांची तब्येतही त्यांची साथ देत नाही, परंतु, तरीदेखील आपल्या कामातून अजूनही सुट्टी त्यांनी घेतलेली नाही.
Marathi News: मराठी बातम्या, Latest News in Marathi, Breaking Marathi News, Marathi News Paper | Maharashtra Times