हायलाइट्स:
- लालकृष्ण अडवाणींच्या वाढदिवसानिमित्त मोदींनी घेतली भेट
- ९४ वर्षीय अडवाणी श्रोत्याच्या भूमिकेत
- वृद्धापकाळ : लालकृष्ण अडवाणी शांत
अडवाणींच्या वाढदिवसानिमित्तानं पंतप्रधान नरेंद्र मोदी सोमवारी अडवाणींच्या घरी दाखल झाले होते. या भेटीत लालकृष्ण अडवाणींनी केवळ एक शब्द उच्चारला… तो म्हणजे ‘धन्यवाद‘…
अडवाणींच्या वाढदिवसानिमित्तानं पंतप्रधान मोदींसोबतच उपराष्ट्रपती व्यंकय्या नायडू, गृहमंत्री अमित शहा, संरक्षण मंत्री राजनाथ सिंह, भाजप अध्यक्ष जे पी नड्डा यांच्यासहीत भाजपचे अनेक नेते आपल्या वयोवृद्ध नेत्याची भेट घेण्यासाठी त्यांच्या घरी दाखल झाले होते.
यावेळी, एका बाजुनं पंतप्रधान मोदींनी तर दुसऱ्या बाजुनं मुलगी प्रतिभा यांनी अडवाणींना धरून लॉनमध्ये आणलं. इथे केक कापून अडवाणींचा वाढदिवस साजरा करण्यात आला. यावेळी, १९९० च्या रथयात्रेत महत्त्वाची भूमिका निभावणारे भाजपचे तत्कालीन फायरब्रांड नेते अडवाणी सौम्य दिसून आले.
मोदींनी अडवाणींशी जवळपास अर्धा तास गप्पा मारल्या. पण यावेळेसही मोदीच जुन्या आठवणीत रंगले होते. अडवाणींच्या हावभावावरून त्यांना या जुन्या गोष्टी आठवत असल्याचं दिसून आलं. शेवटी त्यांनी केवळ एकच शब्द उच्चारला… ‘धन्यवाद’!
गेल्या काही वर्षांपासून अडवाणी व्यक्तीमत्व असंच शांत असल्याचं दिसून येतंय. गेल्या रविवारी भाजपच्या राष्ट्रीय कार्यकारिणी बैठकीत ते व्हर्च्युअल पद्धतीनं सहभागी झाले. परंतु, इथेही त्यांनी एकही शब्द उच्चारला नाही.
२०१४ ते २०१९ दरम्यान १६ व्या लोकसभा कार्यकाळातील ३२१ दिवसांपैंकी २९६ दिवस अडवाणींनी संसदेत हजेरी लावली होती. यावेळेसही त्यांनी श्रोत्याच्या भूमिकेला अधिक पसंती दिली. २००९ ते २०१४ या दरम्यान अडवाणींनी ४२ चर्चांमध्ये सहभाग घेतला होता. यातील जवळपास ३६ हजार शब्द त्यांनी राम मंदिरावर उच्चारले होते.
४ ऑगस्ट २०२० रोजी अयोध्येतील राम मंदिराच्या शिलान्यासापूर्वी एक दिवस अगोदर अडवाणींनी एक व्हिडिओ मॅसेजही जाहीर केला होता. हा एक ‘ऐतिहासिक’ आणि ‘पूर्णत्वाकडे नेणारा’ क्षण असल्याची भावना त्यांनी व्यक्त केली.
Marathi News: मराठी बातम्या, Latest News in Marathi, Breaking Marathi News, Marathi News Paper | Maharashtra Times