हायलाइट्स:
- ‘प्रभू श्रीराम हे राजा दशरथाचे नाही तर श्रृंगी ऋषी निषाद यांचे पुत्र’
- भाजप सहकारी संयज निषाद यांचं वक्तव्य वादात
- संजय निषाद यांच्या दाव्यावर विरोधकांनी भाजपकडे मागितलं स्पष्टीकरण
- निषाद यांच्या वादग्रस्त वक्तव्यानंतर अयोध्येतील संतमंडळीही नाराज
गेल्या रविवारी प्रयागराजमध्ये बोलताना संजय निषाद यांनी हे वक्तव्य केलं. ‘असं म्हटलं जातं की, राजा दशरथांना एकही अपत्य नव्हतं आणि श्रृंगी ऋषींनी त्यांना एक यज्ञ करायला सांगितला. दशरथांनी आपल्या तीन्ही राण्यांना विशेष खीर दिली आणि भगवान श्रीरामांचा जन्म त्यांच्या आईनं खीर खाल्ल्यानंतर झाला. परंतु, वास्तवात केवळ खीर खाल्यानं कुणीही गर्भवती होत नाही. त्यामुळे राम दशरथांचे कथित पुत्र होते, ते श्रृंगी ऋषि निषाद यांचे खरे पुत्र होते’, असा दावा संजय निषाद यांनी ‘रामायण’ या पुराणकथेवर केला आहे.
सोबतच, श्रीरामांचे आई-वडील आणि अयोध्यावासीय त्यांना समजू शकले नाहीत, निषाद राज्यानंच त्यांच्या खऱ्या शक्तीला ओळखलं. जो देवाला ओळखतो त्याचा तो श्रेष्ठ ठरतो. निषाद राज्याचाही हाच दर्जा आहे, असंही त्यांनी पत्रकारांशी बोलताना म्हटलं.
ओवैसींनी मागितलं स्पष्टीकरण
‘ऑल इंडिया मजलिस ए इत्तेहादुल मुस्लिमीन’चे अध्यक्ष खासदार असदुद्दीन ओवेसी यांनीही भाजप आणि राष्ट्रीय स्वयंसेवक संघाचे प्रमुख मोहन भागवत यांच्याकडून निषाद यांच्या वक्तव्यावर स्पष्टीकरण देण्याची मागणी केलीय. ‘संघप्रमुख तर डीएनए एक्सपर्ट आहेत. त्यांनी या प्रकरणावर नक्कीच स्पष्टीकरण द्यायला हवं’ असं म्हणत ओवैसी यांनी भागवतांवर निशाणा साधलाय.
अयोध्येतील संतमंडळी नाराज
संजय निषाद यांच्या या वक्तव्यावर अयोध्येतील संतमंडळींनीही नाराजी व्यक्त केलीय. निषाद यांनी चर्चेत येण्यासाठी ईशनिंदा करणारं वक्तव्य केल्याचा दावा अयोध्येतील संतांनी केलाय. ‘संजय निषाद यांचं वक्तव्य आणि भाषा आक्षेपार्ह आहेच. शिवाय याद्वारे त्यांनी प्रभू श्रीरामाचा आणि त्यांच्या भक्तांचाही अपमान केलाय’ असं श्रीराम जन्मभूमी मंदिराचे मुख्य पुजारी आचार्य सत्येंद्र दास यांनी म्हटलंय. या संत मंडळींकडून भाजपला निषाद पक्षासोबतची युती तोडण्याचा सल्लाही देण्यात आलाय.
संजय निषाद यांचं स्पष्टीकरण
या प्रकरणावर वाद वाढत असल्याचं पाहून निषाद यांनी आपलं वक्तव्य मीडियात चुकीच्या संदर्भासहीत मांडलं जात असल्याचा दावा केलाय. आपण केवळ प्रभू श्री रामाचे गुण आणि त्यांची महानतेचा गौरव करत होतो तसंच निषाद समाज कशा पद्धतीनं प्रभू श्रीरामाशी निगडीत आहे हे सांगण्याचा प्रयत्न करत होतो, असंही त्यांनी म्हटलंय.
Marathi News: मराठी बातम्या, Latest News in Marathi, Breaking Marathi News, Marathi News Paper | Maharashtra Times