आज दुपारी मिलिंद एकबोटे यांनी राज ठाकरे यांची भेट घेतल्याने राजकीय वर्तुळाच्या भुवया उंचावल्या आहेत. कृष्णकुंज येथील भेटीनंतर एकबोटे यांनी प्रसारमाध्यमांशी संवादही साधला. राज ठाकरे यांनी हिंदुत्ववादी भूमिका घेणे स्वागतार्ह आहे. त्यांनी हिंदूंवर होणाऱ्या अन्यायाला वाचा फोडलीच पाहिजे, असे एकबोटे म्हणाले. संभाजी महाराजांचं वढू बुद्रूक हे समाधीस्थान आहे. त्याठिकाणी २४ मार्चला संभाजी महाराजांच्या जयंती निमित्त कार्यक्रम आयोजित करण्यात आला आहे. राज यांनी संभाजी महाराजांच्या समाधीला अभिवादन करण्यासाठी यावं आणि उपस्थितांना मार्गदर्शन करावं, अशी विनंती करण्यासाठी मी आलो होतो, असंही ते म्हणाले. त्यामुळे राज-एकबोटे यांच्या भेटीत हिंदुत्वावर चर्चा झाल्याचं बोललं जात आहे. त्यामुळे राज हे एकबोटे यांनी घेतलेल्या कार्यक्रमाला जाणार की नाही? यावर तर्क-वितर्क लढवले जात आहेत.
कोरेगाव-भीमा हिंसाचार प्रकरणानंतर मिलिंद एकबोटे आणि संभाजी भिडे यांच्यावर पुण्यात अॅट्रॉसिटी आणि दंगल भडकावणे या कलमांखाली गुन्हे दाखल झाले असून पोलिसांकडून या प्रकरणाचा तपास सुरू आहे. दरम्यान, राज ठाकरे आणि मिलिंद एकबोटे यांच्या भेटीविषयी राष्ट्रवादी काँग्रेसचे नेते छगन भुजबळ यांनी प्रतिक्रिया देताना राज ठाकरे हे राजकारणी असल्याने त्यांना कोणालाही भेटण्याचा हक्क आहे. मात्र, त्यांनी प्रबोधनकारांची शिकवण लक्षात ठेवावी, असा सल्लाही भुजबळ यांनी दिला.
Marathi News: मराठी बातम्या, Latest News in Marathi, Breaking Marathi News, Marathi News Paper | Maharashtra Times