हायलाइट्स:
- ‘नवाब मलिकांच्या आरोपांना एवढं वजन कशाला देता?’
- फडणवीसांचा खोचक टोला!
- एसटी संपावरही केलं भाष्य
मुंबईत आरोपांची राळ उठत असताना देवेंद्र फडणवीस आज नागपुरात दाखल झाले. विमानतळावर पत्रकारांशी बोलताना त्यांनी मलिकांच्या ताज्या आरोपांना उत्तर देण्याचं टाळलं. ‘नवाब मलिक यांनी केलेल्या आरोंपाच्या बाबतीत मी केलेलं ट्वीट पुरेसं बोलकं आहे. आशिष शेलार यांची प्रतिक्रियाही पुरेशी बोलकी आहे. त्यांच्या आरोपांना यापेक्षा अधिक वजन नाही. त्याला अधिक वजन कशाला देता?’ असं म्हणत देवेंद्र फडणवीस यांनी मलिक यांच्या आरोपांवर अधिक बोलणं टाळलं आहे.
फडणवीस-मलिकांमध्ये आरोपांच्या फैरी
राज्यात ड्रग्ज प्रकरणावरून विविध घडामोडी घडत असताना नवाब मलिक यांनी देवेंद्र फडणवीस आणि त्यांच्या पत्नी अमृता फडणवीस यांच्यासोबत एका ड्रग्ज तस्कराचा संबंध जोडला. त्यानंतर फडणवीस यांनी पत्रकार परिषदेतून मलिक यांनी गुन्हेगारांकडून जमीन विकत घेतल्याचा आरोप केला होता. तर नवाब मलिक यांनी पलटवार करत फडणवीसांवर बनावट नोटांमधील गुन्हेगारांना संरक्षण दिल्याचा आरोप केल्याने राज्यातील राजकीय वातावरण ढवळून निघालं आहे.
एसटी संपावरही दिली प्रतिक्रिया
एसटी महामंडळाचं राज्य शासनात विलिनीकरण करण्यात यावं, या मागणीसाठी एसटी कर्मचाऱ्यांनी संप पुकारला आहे. या मुद्द्यावरून राज्य सरकार बॅकफूटवर दिसत असताना देवेंद्र फडणवीस यांनी सरकारला इशारा दिला आहे. या आंदोलनाबाबत बोलताना ते म्हणाले की, ‘सरकार दमनशाहीच्या जोरावर कारवाई करून आंदोलन चिरडण्याचा प्रयत्न करेल तर ते अधिकच वाढेल. सरकारने चर्चेतून मार्ग काढावा. कर्मचाऱ्यांना काही ना काही दिलासा द्यावा,’ असं फडणवीस यांनी म्हटलं आहे.
Maharashtra News, Latest Maharashtra News in Marathi, महाराष्ट्र ठळक बातम्या | Maharashtra Times