हायलाइट्स:
- जिल्हा परिषदेला २६ व्हॅक्सिनेशन वाहने प्रदान
- चालकांअभावी सर्व वाहने बंद
- व्हॅक्सिनेशन वाहने गेल्या तीन महिन्यांपासून पंचायत समिती कार्यालयापुढे धुळखात
जिल्ह्यातील १३ तालुक्यांना प्रत्येकी २ अशी एकूण २६ व्हॅक्सिनेशन वाहने राज्य सरकारतर्फे नागपूर जिल्हा परिषदेला देण्यात आली आहेत. मात्र, सध्या ही सगळीच वाहने पंचायत समित्यांच्या कार्यालयापुढे उभी आहेत. ग्रामीण भागात तहसील आणि प्राथमिक आरोग्य केंद्रावर लसीकरणाची सुविधा उपलब्ध आहे. गावातून लसीकरण केंद्र दूर असल्याने लसीकरणाला अपेक्षित प्रतिसाद मिळत नाही. त्यामुळे गावोगाव जाऊन लसीकरण करण्याच्या उद्देशाने पालकमंत्र्यांनी खनि विकास निधीच्या माध्यमातून मोबाईल व्हॅक्सिनेशन वाहने खरेदी केली होती. मानकापूर क्रीडा संकुलात झालेल्या एका कार्यक्रमात या वाहनांचे जिल्हा परिषदेला वितरण करण्यात आले.
वाहने तर आली मात्र त्यासाठी चालकच नाहीत. चालकांची नियुक्ती करणे, त्यांचा पगार काढणे आणि इंधनाचा खर्च भागवण्याची आर्थिक क्षमता जिल्हा परिषदेकडे नसल्याचं सांगितलं जात आहे. तसंच या खर्चाबाबत कोणत्याही प्रकारचं स्पष्ट मार्गदर्शन करण्यात आलेलं नाही. त्यामुळे जिल्हा परिषदसुद्धा खर्चाची जबाबदारी घेत नसल्याचं दिसून आलं आहे. जिल्हा परिषदेने याबाबत राज्य सरकारसोबत पत्रव्यवहारसुद्धा केला. मात्र, अद्याप कोणतंही मार्गदर्शन प्राप्त झालेलं नसल्याची माहिती जिल्हा परिषदेच्या अध्यक्ष रश्मी बर्वे यांनी दिली.
दरम्यान, लाखो रुपयांचा खर्च करून आणलेली व्हॅक्सिनेशन वाहने गेल्या तीन महिन्यांपासून पंचायत समिती कार्यालयापुढे धुळखात पडलेली असल्याने नागरिकांकडून नाराजी व्यक्त करण्यात येत आहे.
Maharashtra News, Latest Maharashtra News in Marathi, महाराष्ट्र ठळक बातम्या | Maharashtra Times