मंदिराचा पूर्व आणि दक्षिण दरवाजा, भवानी मंडपात अंध विक्रेते नवीन वर्षाचे मराठी, हिंदी, कन्नड भाषेतील कॅलेंडर विकतात. करोनामुळे काही जण मास्क विक्रीही करतात. काही ठिकाणी अंध दाम्पत्य एकत्र विक्री करतात, तर डोळ्याने दिसणारी पत्नी अंध पतीसह कॅलेंडर आणि मास्क विक्री करते. अंध आईला मदत करण्यासाठी त्यांचा मुलगाही व्यवसायात मदत करत असल्याचं चित्र पाहायला मिळते.
दिवसातून १५ ते २० कॅलेंडरची विक्री होते. काही जण उपनगरातून मंदिर परिसरात विक्री करण्यासाठी येतात तर काही थेट जयसिंगपूर, कबनूरमधून कोल्हापुरात कॅलेंडर विक्रीसाठी येतात. एसटीचा संप असला तरी रेल्वेने ते कोल्हापुरात पोहोचतात. ‘कोल्हापूरचा अंध कधीही भीक मागणार नाही, पण वस्तूंची विक्री करुन स्वाभिमानाने जगणार’ असंही ते सांगतात.
दरम्यान, ‘पर्यटक, भाविक आणि ग्राहकांनी कोणत्याही अंध विक्रेत्यांकडून वस्तू खरेदी करुन त्यांच्या जगण्याच्या लढाई मदत करा’, हे सांगायलाही ते विसरत नाहीत. अंबाबाईच्या मुर्तीसमोर नतमस्तक होणाऱ्या भाविकांनी या अंधाच्या लढाईला बळ देण्यासाठी एक मास्क किंवा एक कॅलेंडर खरेदी केले तर खऱ्या अर्थाने माणुसकीचा धर्म जपला जाईल.
Maharashtra News, Latest Maharashtra News in Marathi, महाराष्ट्र ठळक बातम्या | Maharashtra Times