अफगाणिस्तानमधील सुरक्षा व भारतीय उपखंडाला असलेले दहशतवादाचे आव्हान यावर भारताने दिल्ली क्षेत्रीय सुरक्षा संवाद आयोजित केला आहे. यामध्ये भारतासह रशिया, इराण, कझाकस्तान, किर्गिझस्तान, ताजिकिस्तान, तुर्कमेनिस्तान व उझबेकिस्तान या देशांतील सुरक्षा प्रतिनिधी सहभागी झाले आहेत. तालिबानने या देशावर ताबा मिळवल्याने उभे राहिलेले दहशतवादाचे आव्हान, कट्टरता आणि अमली पदार्थांची तस्करी रोखण्यासाठी समान दृष्टिकोन अवलंबण्याचे व्यापक उद्दिष्ट आखण्यात आले आहे. या परिषदेसाठी भारताने पाकिस्तान व चीनलाही आमंत्रित केले होते. मात्र या देशांनी त्याकडे पाठ फिरवली.
या चर्चेनंतर आठ देशांनी संयुक्त जाहीरनाम्यावर शिक्कामोर्तब करीत अफगाणिस्तानातून दहशतवाद्यांसाठी आश्रय, दहशतवादी प्रशिक्षण आणि दहशतवाद्यांना अर्थपुरवठा होऊ नये, यासाठी एकजूट राखण्याचेही जाहीरनाम्यात स्पष्ट करण्यात आले. अफगाणिस्तानची सार्वभौमत्व, एकता व प्रादेशिक अखंडता कायम राखण्याचा शब्दही यातून देण्यात आला आहे.
उद्घाटनीय भाषणात भारताचे राष्ट्रीय सुरक्षा सल्लागार अजित डोवाल यांनी अलीकडच्या दहशतवादी घटनांकडे लक्ष वेधत यामुळे केवळ अफगाणी नागरिकच नव्हे, तर या क्षेत्रावरही परिणाम होत आहे, असे सांगितले. ‘सध्याच्या घडीला या क्षेत्रातील सर्व देशांनी एकत्र येत व्यापक सहकार्य व समन्वय साधत अफगाणिस्तानातील घडामोडींमुळे उभ्या राहिलेल्या आव्हानांशी मुकाबला करायला हवा. आपले एकत्रित प्रयत्न उपयुक्त ठरतील तसेच याद्वारे अफगाण जनतेचे हित साधून हे क्षेत्र सुरक्षित राहील’, असा विश्वासही डोवाल यांनी व्यक्त केला. यावेळी इराणच्या सर्वोच्च राष्ट्रीय सुरक्षा परिषदेचे सचिव रिअर अॅडमिरल अली शामखानी यांनी दहशतवाद, दारिद्र्य व मानवतावादावरील संकटाबाबत चिंता व्यक्त केली. तर, रशियाच्या सुरक्षा परिषदेचे सचिव निकोलाई पत्रोशेव्ह यांनी प्रादेशिक स्थिरतेसाठी सर्वांनी सामूहिक उपाययोजना करणे गरजेचे आहे, यावर जोर दिला.
पाकमधील परिषदेत चीनचा सहभाग
भारताने आयोजित केलेल्या सुरक्षा परिषदेकडे पाठ फिरवलेल्या चीनने आपला मित्र देश पाकिस्तानातील याच मुद्द्यावरील परिषदेसाठी मात्र हजेरी लावण्याचा निर्णय घेतला आहे. अफगाणिस्तानच्या प्रश्नावर पाकिस्तानही परिषद आयोजित करीत असून, यामध्ये अमेरिका, चीन व रशियाचे पाकमधील राजनैतिक अधिकारी उपस्थित राहणार आहेत.
Marathi News: मराठी बातम्या, Latest News in Marathi, Breaking Marathi News, Marathi News Paper | Maharashtra Times