हायलाइट्स:
- सलमान खुर्शीद यांचं पुस्तक ‘सनराइज ओव्हर अयोध्या, नेशनहूड इन अवर टाइम्स’ प्रकाशित
- दिल्लीच्या वकिलांनी दाखल केली तक्रार
- दिल्ली पोलीस आयुक्तांकडे गुन्हा दाखल करण्याची मागणी
सलमान खुर्शीद यांच्या ‘सनराइज ओव्हर अयोध्या, नेशनहुड इन अवर टाइम्स‘ नावाच्या पुस्तकात सलमान खुर्शीद यांनी सर्वोच्च न्यायालयाच्या अयोध्या राम जन्मभूमी संदर्भातील निर्णयाचं कौतुक करताना काही प्रश्नही उपस्थित केले आहेत. देश आता या वादातून पुढे जाईल, अशी आशाही त्यांनी व्यक्त केलीय.
आपल्या पुस्तकात खुर्शीद यांनी हिंदुत्वाची तुलना ‘आयएसआयएस’ आणि ‘बोको हराम‘ यांसारख्या दहशतवादी संघटनांशी केली आहे. ‘इसिस’ आणि ‘बोको हरम’ या इस्लामित संघटनांप्रमाणेच ‘हिंदुत्व‘ही साधुसंतांच्या सनातन आणि प्राचीन हिंदू धर्माला नष्ट करत असल्याचंही खुर्शीद यांनी म्हटलंय.
या वादावर विरोधकांना प्रत्यूत्तर देताना सलमान खुर्शीद यांनी आपल्या दाव्याचा पुनरुच्चार केला. ‘हिंदू धर्म हा उच्च स्तराचा धर्म आहे. यासाठी महात्मा गांधींनी दिलेल्या प्रेरणेहून अधिक मोठी प्रेरणा असून शकत नाही. कुणी येऊन त्याला वेगळं लेबल लावलं तर त्याला मी का मान्य करू? कुणीही हिंदू धर्माचा अपमान केला तर मी बोलणार. हिंदुत्वाचं राजकारण करणारे चुकीचे आहेत आणि आयएसआएएसदेखील चुकीचे आहेत, असं मी म्हटलंय’ असं म्हणत त्यांनी आपल्या वक्तव्यावर स्पष्टीकरण दिलंय.
सर्वोच्च न्यायालयाच्या निर्णयाचं कौतुक
‘अयोध्यावादानंतर समाजाच उभी फूट पडल्याचं चित्र निर्माण झालं होतं. सर्वोच्च न्यायालयानं त्यावर तोडगा काढला. कोर्टाच्या निर्णयानं दूरदृष्टी दाखवत हा निर्णय दिलाय. यामध्ये, कुणाही एकाचा विजय आणि दुसऱ्याचा पराभव होणार नाही, असा हा निर्णय आहे’ असंही म्हणत खुर्शीद यांनी न्यायालयाच्या निर्णयाचं कौतुक केलं.
याचसोबत, सत्ताधारी भाजपवर निशाणा साधत ‘आम्ही जिंकलो, असं जाहीरपणे वक्तव्य करण्यात आलं नसलं तरी बऱ्याचदा असे संकेत आपल्या कृत्यांतून देण्याचा प्रयत्न करण्यात आला. सर्वांना एकत्र जोडण्याचे प्रयत्न व्हायला हवेत. अयोध्येतील उत्सव हा केवळ एका राजकीय पक्षाचा उत्सव असल्याचं दिसून येतं’, असंही त्यांनी म्हटलंय.
सर्वोच्च न्यायालयानं अयोध्येचा निकाल दिल्यानंतर या स्थळावर भव्य मंदिर उभारलं जायला हवं अशी घोषणा होते. मात्र याचवेळी सर्वोच्च न्यायालयानं दिलेल्या आदेशात मश्चिदसाठीही जमीन देण्याच्या दिलेल्या निर्देशाकडे सोयीस्करपणे दुर्लक्ष केलं जातं, असं म्हणत भाजपवर त्यांनी निशाणा साधलाय.
‘हिंदुत्वाचं राजकारण’
देशातील हिंदुत्वावादी राजकारणाच्या प्रभावाची चर्चा करताना सलमान खुर्शीद आपल्या पुस्तकात म्हणतात, ‘माझा स्वत:चा पक्ष, काँग्रेसमध्ये अनेकदा चर्चा या मुद्याकडे वळते. काँग्रेसमध्येही एक असा वर्ग आहे, ज्यांना या गोष्टीचा पश्चाताप आहे की आपली प्रतिमा अल्पसंख्यांक समर्थक पक्ष म्हणून आहे. हा गट नेतृत्वाच्या जानवधारी ओळखीला उचलून धरतो’
Marathi News: मराठी बातम्या, Latest News in Marathi, Breaking Marathi News, Marathi News Paper | Maharashtra Times