हायलाइट्स:
- खासगी प्रवासी एजंटने थेट ठक्कर बाजार बस स्थानकात आणली कार
- राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाची प्रवासी सेवा असल्याचं दिलं कारण
- अधिकाऱ्यांनी खासगी एजंटला बस स्थानकाच्या बाहेर काढलं
एसटी महामंडळाची बस सेवा बंद असल्यानं सध्या खासगी वाहनचालकांना सुगीचे दिवस आले आहेत. दिवसभरात हजारो प्रवासी खासगी वाहनांमधून प्रवास करत आहेत. यामुळे एजंटचाही सुळसुळाट झाला आहे. असाच एक एजंट सायंकाळी साडेपाच वाजेच्या दरम्यान एमएच ०४ जीजे १८०४ या क्रमाकांची कार घेऊन ठक्कर बाजार येथील धुळे फलाटासमोर उभा राहिला.
या कारवर राष्ट्रवादी काँग्रेस उपाध्यक्ष, भिवंडी शहर जिल्हा असा फलकही लावला होता. त्याने कारमधून उतरताच राष्ट्रवादी काँग्रेसतर्फे प्रवासी सेवा अशी आरोळी ठोकत अवघ्या ४०० रूपयांमध्ये घेऊन जाण्याचे आश्वासन दिलं. हा गोंधळ ऐकून एसटीचे अधिकारी तेथे आले. एकाने संबंधित व्यक्तीचा बखोटा धरून त्यास बाहेर काढले. बस बंद असल्याने सर्वसामान्य प्रवाशांच्या सोयीसाठी ही सुविधा उपलब्ध करून देत असल्याचा बचावात्मक पवित्रा या व्यक्तीने घेतला. मात्र, बस स्थानकावर बंदोबस्तावर असलेल्या पोलिसांनी लागलीच या व्यक्तीचा ताबा घेतला.
शिवशाही बस फलाटावर उभ्या असताना खासगी एजंटांनी अशी दादागिरी करणे चुकीचं असल्याचं एसटीच्या अधिकाऱ्यांनी स्पष्ट केलं. दरम्यान, या प्रकरणी रात्री उशिरापर्यंत कोणताही गुन्हा दाखल झाला नव्हता.
आरटीओला प्रतिक्षा तक्रारीची
प्रवाशांची ओढाताण सुरू असताना खासगी वाहनचालक मनमर्जी भाडे वसूल करत आहे. एजंट अव्वाच्या सव्वा पैस वसूल करत असून, प्रादेशिक परिवहन विभाग मात्र तक्रारीची प्रतिक्षा करत आहेत. अधिकृत तक्रार आल्यानंतर कारवाई करू असा पवित्रा आरटीओ विभागाने घेतल्याने प्रवाशांच्या संतापात भर पडली आहे.
Maharashtra News, Latest Maharashtra News in Marathi, महाराष्ट्र ठळक बातम्या | Maharashtra Times