मुंबई : एसटी महामंडळाचं (MSRTC) राज्य सरकारमध्ये विलिनीकरण करण्याच्या मागणीसाठी कामगारांनी पुकारलेला संप १५ दिवसांनंतरही सुरूच आहे. हा संप मागे घेतला जावा म्हणून राज्य सरकारकडून हरतऱ्हेचे प्रयत्न सुरू आहेत. राष्ट्रवादी काँग्रेसचे अध्यक्ष शरद पवार, मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांच्यानंतर आता एसटी महामंडळानं कामगारांना संप मागे घेण्याचं व कामावर रुजू होण्याचं आवाहन केलं आहे.

महामंडळानं आज कामगारांना उद्देशून एक पत्रक काढलं आहे. त्या पत्रकार भावनिक आवाहन करण्यात आलं आहे. महामंडळानं कामगारांसाठी आतापर्यंत घेतलेल्या निर्णयांची सविस्तर माहिती देण्यात आली आहे. करोनाच्या संकटामुळं आपली लालपरी आधीच आर्थिक संकटात आहे. संप करून तिला आणखी गर्तेत लोटू नका. सध्या एसटीचा संचित तोटा १२ हजार कोटी रुपयांपर्यंत पोहोचला आहे. असं असूनही गेल्या १८ महिन्यांचं वेतन महामंडळानं दिलं आहे. त्यासाठी राज्य सरकारनं ३५४९ कोटींचा निधी दिला आहे. यापुढं सर्वांचं वेतन वेळेवर देण्याचा प्रामाणिक प्रयत्न केला जाईल, अशी ग्वाही महामंडळानं दिली आहे.

‘शासकीय कर्मचाऱ्यांच्या धर्तीवर महागाई भत्ता (२८ टक्के) व घरभाडे भत्त्याची (८,१६,२४ टक्के) आपली मागणी मान्य करण्यात आली आहे. दिवाळी भेटही देण्यात आली आहे. असं असताना विलिनीकरणाच्या अचानक पुढं आलेल्या मागणीसाठी संप सुरू आहे, त्या मागणीचाही विचार सुरू आहे. मुख्य सचिवांच्या अध्यक्षतेखाली त्रिसदस्यीय समिती नेमण्यात आली आहे, असं महामंडळानं म्हटलं आहे.

MSRTC आवाहन

एसटी महामंडळानं काढलं परिपत्रक

सध्याच्या संपामुळं महामंडळाला दररोज १५ ते २० कोटी रुपयांचा तोटा होत आहे. संपाचे विपरीत आर्थिक परिणाम आपल्याला दीर्घकाळ भोगावे लागणार आहेत. संपामुळं गेले कित्येक दिवस सर्वसामान्यांचे अतोनात हाल होत आहेत. या साऱ्याचा विचार करून आपण तातडीनं संप मागे घ्यावा व कामावर रुजू व्हावे, अशी विनंती महामंडळानं कामगारांना केली आहे.

Marathi News: मराठी बातम्या, Latest News in Marathi, Breaking Marathi News, Marathi News Paper | Maharashtra Times

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here