हायलाइट्स:
- पुण्यात फसवणुकीचा धक्कादायक प्रकार उघड
- अंध व्यक्तीशी लग्न केल्यानंतर सात महिन्यांनी नवरी पळाली
- घरातील दागिने आणि रोकड लुटून केला पोबारा
मिळालेल्या माहितीनुसार, फसवणूक झालेली व्यक्ती आरबीआयमध्ये काम करते. ते अंध आहेत. या प्रकरणी त्यांनी विमानतळ पोलिसांत तक्रार दाखल केल्यानंतर पोलिसांनी पाच जणांविरोधात गुन्हा दाखल केला आहे. कैलास कुमार सिंघवी, सारिका बंब, नंदलाल, कमला आणि राजू कोठारी अशी गुन्हा दाखल झालेल्यांची नावे आहेत.
पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, आरबीआयमध्ये काम करणारी व्यक्ती अंध असल्याने लग्न जमत नव्हते. मध्यस्थांमार्फत त्यांना लग्नासाठी स्थळ आले होते. सारिका बंब असे तिचे नाव होते. लग्न करायचे असेल तर, मुलीच्या कुटुंबीयांना पैसे द्यावे लागतील, असे मध्यस्थांनी फिर्यादीला सांगितले होते. त्यामुळे वेळोवेळी त्यांनी मुलीच्या कुटुंबीयांना आठ लाखांहून अधिक रुपये दिले. काही दिवसांपूर्वीच फिर्यादी आणि सारिकाचे लग्न झाले होते. लग्न होऊन सात महिने झाले. सात महिन्यांचा संसार केल्यानंतर मुलीने घरातून दागिने आणि रोकड घेऊन पोबारा केला.
फिर्यादीने तिच्याशी अनेकदा संपर्क साधण्याचा प्रयत्न केला. त्यावेळी तिने परत येण्याचे आश्वासन दिले. पण ती काही परत आलीच नाही. त्यामुळे आपली फसवणूक झाली हे त्यांच्या लक्षात आले. त्यांनी थेट पोलीस ठाणे गाठले आणि तिच्यासह पाच जणांविरोधात तक्रार दाखल केली. पोलिसांनी पाच जणांविरोधात गुन्हा दाखल करून तपास सुरू केला आहे.
Marathi News: मराठी बातम्या, Latest News in Marathi, Breaking Marathi News, Marathi News Paper | Maharashtra Times